Kamal Kaur Murder पंजाबच्या भटिंडा या ठिकाणी राहणारी कमल कौर या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृतदेह ११ जूनच्या रात्री कारमध्ये मिळाला होता. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवत ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कमल कौरच्या हत्येचा कट तीन महिने आधीपासूनच रचला गेलाहोता. या प्रकरणातील मास्टरमाईंड अमृतपाल सिंह हा परदेशात पळाला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत होते, आता त्यांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.
नेमकी घटना काय?
कमल कौर उर्फ कांचन कुमारी या इन्फ्लुएन्सरचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आला होता. १२ जूनला ही घटना घडली होती. कांचन कुमारीची हत्या करण्यात आली असून तिच्या हत्येचा कट मागील तीन महिन्यांपासून रचण्यात येत होता. मुख्य आरोीप अमृतपाल सिंहने तिच्या घराची रेकी केली होती. त्यानंतर तो कार प्रमोशन करायचं आहे हे निमित्त काढून तिला भेटला होता. हत्येच्या दिवशी अमृतपालने कांचनला तिच्याच कारमध्ये बसवलं. तो स्वतः तिची कार चालवू लागला. त्याचवेळी त्यांच्या बाजूनेही एक कार चालली होती. कांचनच्या कारमध्ये कांचन, अमृतपाल, निर्मलजीत आणि जसप्रीत होते. अमृतपालने शिताफीने कांचनच्या दोन मोबाइलचे पासवर्ड मिळवले. त्यानंतर अमृतपालने सांगितल्याप्रमाणे जसप्रीत आणि निर्मलजीत या दोघांनी कांचनला कानशीलात लगावून दिली. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या ेकली.
कांचनची हत्या करुन अमृतपाल देश सोडून पळाला
कांचनची हत्या केल्यावर अमृतपाल देश सोडून पळाला आहे. त्याने रणजीत नावाच्या एका कार मालकाला अडवलं. त्याला धाक दाखवून त्याची कार घेतली आणि तो पळाला. या प्रकरणी पोलिसांनी रणजीतचीही तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलिसांनी सांगितलं या प्रकरणाचा मास्टरमाईंड अमृतपाल हा विदेशात पळाला आहे. त्याच्या विरोधात आम्ही लुकाऊट नोटीस जारी केली आहे.
कांचन कुमारीचा शवविच्छेदन अहवाल येणं बाकी
कांचन कुमारीचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतर हे देखील स्पष्ट होणार आहे की कांचनवर हत्येआधी बलात्कार झाला होता का ? पोलीस या पैलूनेही हे प्रकरण तपासत आहेत. भटिंडामध्ये पोलीस या प्रकरणाशी संबंधित सर्व संशयितांची चौकशी करत आहेत. अमृतपालला परत आणण्यासाठी आवश्यक की प्रक्रिया आम्ही सुरु केल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.