सात प्रकरणे पुन्हा चौकशीसाठी खुली करण्याचा ‘एसआयटी’चा निर्णय

नवी दिल्ली : शीखविरोधी दंगलींत ज्यामध्ये आरोपींची एक तर सुटका करण्यात आली होती किंवा खटला बंद करण्यात आला होता, अशी सात प्रकरणे पुन्हा खुली करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) घेतला आहे. यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या सातपैकी एका प्रकरणात आरोपी असलेल्या पाच लोकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कथितरीत्या आश्रय दिला होता, असे दिल्लीचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सांगितले.

नवी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नोंदल्या गेलेल्या एफआयआरमध्ये नाथ यांचे नाव कधीही नव्हते. या एफआयआरमध्ये उल्लेख केलेल्या पाच जणांना नाथ यांच्या निवासस्थानी आश्रय देण्यात आला होता. या सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका झाली होती. आता एसआयटी याही प्रकरणाचा फेरतपास करणार असल्यामुळे दोन साक्षीदार त्यांच्यापुढे हजर होतील आणि ते कमलनाथ यांच्या दंगलीतील भूमिकेबद्दल माहिती देतील, असे सिरसा यांनी पीटीआयला सांगितले.

सध्या इंग्लंडमध्ये राहणारे संजय सुरी आणि पाटण्यात राहणारे मुख्तियार सिंग हे ते दोन साक्षीदार आहेत. मी या दोघांशीही बोललो असून ते त्यांचे बयाण नोंदवण्यासाठी एसआयटीपुढे हजेरी लावण्यास तयार आहेत, असे सिरसा म्हणाले. दंगलखोरांचा जमाव येथील गुरुद्वारा रकाब गंज साहिबमध्ये शिरल्याशी संबंधित हे प्रकरण आहे. कमलनाथ यांनी यापूर्वी आरोप फेटाळले आहेत.