अभाविपला रोखण्यासाठी डाव्या संघटनांची एकजूट; ९ सप्टेंबरला निवडणूक
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीमुळे पुन्हा प्रकाशझोतात येत आहे. देशविरोधी घोषणा आणि त्यानंतरचा राजद्रोहाचा खटला यामुळे लक्ष वेधून घेतलेल्या कन्हैयाकुमार याच्या अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाने (एआयएसएफ) निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संघपरिवाराशी निगडित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात असले तरी डाव्या गटांमध्ये सर्व काही ठाकठीक नसल्याचे दिसते आहे.
मागील वर्षीच्या निवडणुकीत ‘एआयएसएफ’चा कन्हैयाकुमार विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष म्हणून विजयी झाला होता. मात्र त्याच वेळी डाव्या विचारांच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याने डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या ‘जेएनयू’मध्ये अभाविपने बाजी मारली होती. चौदा वर्षांनंतर प्रथमच अभाविपचा सौरभ शर्मा सहसचिव म्हणून विजयी झाला होता. हे लक्षात घेऊन आणि जेएनयूमध्ये मोठे वैचारिक ध्रुवीकरण झाल्याचे लक्षात घेऊन यंदा कन्हैयाकुमारच्या संघटनेने निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एसएफआय’ आणि ‘आयसा’ या डाव्या संघटनांच्या युतीला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय कन्हैयाकुमारने घेतला आहे. अभाविपला रोखण्यासाठी डाव्यांमध्ये एकजूट असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही उमेदवार उभे करणार नसल्याचे ‘एआयएसएफ’कडून सांगितले जात आहे. डाव्या उमेदवारांसाठी कन्हैयाकुमार प्रचार करणार आहे, पण माघार घेण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
अभाविपने यास कन्हैयाकुमारचा पळपुटेपणा म्हटले आहे. या मूठभर मंडळींमुळे ‘जेएनयू’ बदनाम झाल्याचे अभाविपची अध्यक्षपदाची उमेदवार जान्हवी ओझा हिने सांगितले. आमच्याविरुद्ध सगळे एक झाल्यावरून अभाविपचा धसका सर्वानी घेतल्याचे लक्षात येते, असेही ती म्हणाली. काँग्रेसच्या एनएसयूआयचे फारसे अस्तित्व नाही. याउलट बिरसा- आंबेडकर-फुले विद्यार्थी संघटनेच्या (बाप्सा) छत्राखाली दलित चळवळीतील विद्यार्थ्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्या पक्षांसाठी ते अडचणीत आणणारे ठरेल.
९ सप्टेंबरला निवडणूक होत असून मतमोजणी त्याच दिवशी आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव पदांसाठी निवडणूक आहे.
विद्यार्थी व त्यांचे ‘राजकीय पालक’
- भारतीय विद्यार्थी महासंघ (एसएफआय) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
- अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (आयसा) – मार्क्सवादी (लेनिनवादी)
- अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ (एआयएसएफ) – भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय)
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) – भाजप- संघपरिवार
- भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषद (एनएसयूआय) – काँग्रेस</li>
- बिरसा- आंबेडकर- फुले विद्यार्थी संघटना (बाप्सा) – दलित चळवळ
- स्वराज विद्यार्थी संघटना – योगेंद्र यादव यांच्या स्वराज संघटनेची विद्यार्थी आघाडी