आजकाल बॉलिवूड कलाकारांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबी पाठोपाठ आता दाक्षिणात्य गायिकेन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या गायिकेचे नाव सुष्मिता असे आहे. सुष्मिताने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक नोट लिहिली असून आई आणि भावाला व्हॉट्स अॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला आहे.

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायिकेने तिच्या मृत्युपत्रात हुंड्यासाठी पती, त्याची बहीण आणि काकी यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच सुष्मिताने आत्महत्या केल्याचे तिच्या भावाने पोलीसांना कळवले. तिने रात्री एकच्या सुमारास भाऊ सचिनला व्हॉट्स अॅप मेसेज करुन पती आणि त्याचा घरातील इतर सदस्य तिला त्रास देत असल्याचे सांगितले. सचिनने तो मेसेज सकाळी साडेपाच वाजता पाहिला. त्यानंतर त्याने लगेच बहिणीच्या घराकडे धाव घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुष्मिताने शरथ कुमारशी लग्न केले होते. शरथ हा एका खासगी कंपनीमध्ये काम करत आहे. बंगळुरुमधील अन्नपूर्णेश्वरी नगर येथील पोलीस आरोपी शरथचा शोध घेत आहेत. सुष्मिताने ‘हलू थूप्पा’ आणि ‘श्रीसमन्या’ या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.