आम आदमी पक्षातील वादांची मालिका अद्याप सुरुच असून, यामध्ये आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. दिल्लीच्या मंत्रिमंडळातील सदस्य कपिल मिश्रा हे भाजपच्या तोंडातील भाषा बोलत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी आज केला.
मिश्रा यांची नुकतीच मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बेकायदेशीररित्या पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. केजरीवाल यांनी दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता. अशाप्रकारे पैशांचा झालेला व्यवहार आपण आपल्या डोळ्याने पाहिला असल्याचेही मिश्रा म्हणाले होते. या आरोपाचे खंडन करताना सिंग बोलत होते.




मिश्रा सध्या केजरीवाल यांच्यावर करत असलेला आरोप काही कालावधीपूर्वी भाजपनेही केला असल्याचे सिंग यांनी म्हणाले. केंद्रातील भाजप सरकार आम आदमी पक्षाची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. आवाज दाबण्याचे काम केंद्रात असलेले भाजप सरकार करत आहे. एकीकडे सीमेवर जवान शहीद होत आहेत, काश्मीर प्रश्न पेटला आहे, माओवाद्यांकडून सुकमामध्ये विध्वंस करण्यात येतो आहे, मात्र भाजप सरकारचे सगळे लक्ष ‘आप’ला संपविण्याकडेच लागले असल्याचा आरोपही त्यांनी यानिमित्ताने केला.
अशाप्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप पक्षातील नेत्यांवर यापूर्वीही अनेकदा झाले आहेत. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अण्णा हजारेंची चळवळ चालू असताना मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांच्यावरही अशाप्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे कालांतराने स्पष्ट झाले होते. त्याचप्रकारे आता मिश्रा यांनी केलेल्या आरोपातही कोणते तथ्य नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.