₹500 crore fraud case कर्नाटकमधील मंगळुरूतील एका ४५ वर्षीय व्यक्तीने अनेक व्यावसायिक आणि उद्योगपतींना फसवत कोटींचा गंडां घातला. मंगळुरू पोलिसांनी त्याच्या आलिशान घरी छापा टाकत त्याला अटक केली. रोहन सलदान्हा याने व्यापारी आणि उद्योगपतींना कमी व्याजदरात मोठ्या कर्जाचे आमिष दाखवून कोट्यवधींचा घोटाळा केला. सलदान्हा हा एक उच्च-स्तरीय वित्तपुरवठादार म्हणून स्वतःला सादर करायचा आणि अतिश्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करायचा. त्यासाठी त्याने मंगळुरूच्या जप्पीनामोगारू येथील त्याच्या आलिशान बंगल्याचा वापर केला. अखेर पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकत त्याला अटक केली.
रोहन सलदान्हाने कशी केली फसवणूक
श्रीमंत व्यावसायिकाची ओळख असलेल्या रोहन सलदान्हाने भारतातील अनेक श्रीमंत लोकांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कर्जे आणि रिअल इस्टेट डील देण्याचे आश्वासन देऊन फसवले. त्याने लोकांची फसवणूक करत त्यांना तब्बल ५०० कोटींचा गंडा घातला. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, पोलीस आयुक्त सुधीर कुमार रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त रवीश नायक यांच्या नेतृत्वाखालील छाप्यात रोहन सलदान्हाच्या भव्य हवेलीतील अनेक गुप्त जागांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान पोलिसांना लपलेले चेंबर्स, विदेशी वनस्पती आणि गुप्त पळून जाण्याचे मार्ग आढळून आले.
रोहन सलदान्हा हा एक प्रतिष्ठित व्यावसायिक असल्याचे भासवत होता. तो मोठ्या डीलच्या शोधात असलेल्या श्रीमंत लोकांना लक्ष्य करत होता. त्याने ५०० कोटींपर्यंतचे बनावट व्यवसाय कर्ज आणि उच्च परतावा देणाऱ्या रिअल इस्टेट गुंतवणुकीचे आश्वासन दिले आणि पीडितांना पैशाचे स्वप्न दाखवले. त्याने प्रक्रिया आणि कायदेशीर मंजुरीसाठी पीडितांना ५० लाख ते ४ कोटींपर्यंतची आगाऊ रक्कम देण्यास भाग पाडले गेले. पैसे मिळाल्यानंतररोहन सलदान्हा अचानक गायब झाला, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडितांच्या लक्षात आले.
त्याच्या एका बँक खात्यात फक्त तीन महिन्यांत ४० कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार दिसून आले. त्यावरून हा घोटाळा दिसत होता त्यापेक्षा खूपच व्यापक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, असे ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिले. घरात लाखो किमतीच्या दुर्मिळ वनस्पती आणि जुन्या दारूचे संग्रहदेखील पोलिसांना आढळले.
रोहन सलदान्हाने पीडितांना खात्री दिली की, त्याच्याकडे ६०० कोटी पर्यंत कर्ज मंजूर करण्यास सक्षम असलेले शक्तिशाली आर्थिक नेटवर्क्स आहे. त्यामुळे त्याची विश्वासार्हता अधिकबळकट झाली. पोलीस आता त्याच्या संपत्तीचे मूळ, मनी लाँडरिंग आणि आर्थिक गुन्ह्यांशी त्याच्या संबंधांचा तपास करत आहे.