Karnataka Minister Zameer on Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपण स्वत: सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

शुक्रवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत खान यांनी यासंबंधीचे विधान केले आहे. पाकिस्तान हा नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी दिली तर आपण युद्धाला जाण्यास तयार आहोत असेही खान म्हणाले आहेत. “आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्याबरोबर कधीही कसलेही संबंध नव्हते. पाकिस्तान आपला कायम शत्रू राहिलेला आहे…. जर मोदी, अमित शाह आणि केंद्र सरकारने परवानगी दिली तर मी युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे,” असे खान म्हणाले.

तसेच त्यांनी पीएम मोदी आणि अमित शाह यांच्याकडे त्यांना आत्मघातकी बॉम्ब देण्याची विनंती केली आहे. “मी युद्धासाठी पाकिस्तानात जाईन. मोदी, शाह यांनी मला आत्मघातकी बॉम्ब देऊ द्या, तो मी माझ्या शरीरावर बांधेन आणि पाकिस्तानात जाऊन त्यांच्यावर हल्ला करेन,” असे मंत्री खान म्हणाले.

दरम्यान यापूर्वी खान यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला निष्पाप नागरिकांविरोधातील घृणास्पद आणि अमानवी कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी प्रत्येक भारतीयाने एकजूट दाखवली पाहिजे असे सांगत केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले.

२६ जणांचा मृत्यू

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता, या हल्लात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ज्यामध्ये भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार रद्द केला आहे, पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी भारताचे हवाई क्षेत्र बंद करणे आणि तसेच पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर पाकिस्तानने देखील भारताबरोबर व्यापार स्थगित केला आहे आणि भारतीय विमानासांठी त्यांची हवाई सीमा बंद केली आहे.