पीटीआय

‘हिजाब घातल्याशिवाय आम्ही महाविद्यालयात प्रवेश करणार नाही’, असा हट्ट कर्नाटकच्या काही महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी बुधवारी न्यायालयाच्या आदेशानंतरही कायम ठेवला. हिजाबबंदीच्या विरोधातील ज्यांची याचिका कर्नाटक उच्च न्ययालयाने आदल्या दिवशी फेटाळून लावली होती, त्या उडुपी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील ६ मुस्लीम विद्यार्थिनीही बुधवारी वर्गात बसल्या नाहीत.

 हिजाब ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे सांगून;  शांतता, एकोपा व सार्वजिनक सुव्यवस्था यांना बाधक ठरणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या पोशाखावर बंदी घालणारा कर्नाटक सरकारचा आदेश उच्च न्यायालयने १२९ पानी निकालपत्रात योग्य ठरवला होता.

 मात्र, आम्ही हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश करणार नाही हा हट्ट उडुपीच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी कायम ठेवला आणि आपण याप्रकरणी कायदेशीर लढा देऊ असे सांगितले. महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन वर्गाच्या दुसऱ्या पूर्वतयारी परीक्षा सुरू असताना त्या गैरहजर राहिल्या.

 हिजाब वादामुळे पूर्वी अशांततेचे वातावरण पाहिलेल्या शिवमोगातील कमला नेहरू महाविद्यालयातही, आपण हिजाब घातल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश करणार नाही असे सांगून १५ मुस्लीम विद्याथिर्नी परत गेल्या. याच जिल्हा मुख्यालयाच्या शहरात हिजाब वादातून बजरंग दलाच्या एका तरुण कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी भररस्त्यात हत्या करण्यात आल्याने तणाव पसरला होता.

 या १५ मुली बुरखा व हिजाब घालून आल्या, मात्र महाविद्यालय व्यवस्थापनाने त्यांना प्रवेश न दिल्यामुळे त्यांनी वर्गात न बसण्याचे ठरवले. ‘हिजाब हा आमचा धार्मिक अधिकार आणि ओळख असून, त्याच्याशिवाय आम्ही महाविद्यालयात प्रवेश करू शकत नाही’, असे त्यांच्यापैकी एका मुलीने पत्रकारांना सांगितले. ‘हा प्राचार्य किंवा शिक्षकांचा दोष नाही. खरेतर आम्हाला न्याय मिळाला नाही’, असे दुसरी मुलगी म्हणाली.

दरम्यान, उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुस्लीमबहुल भटकळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या एका गटाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत ‘असमाधान व्यक्त करण्यासाठी’ बुधवारी बंद पाळला. यामुळे बर्मा बाजार, मेन रोड, मदिना कॉलनी व नवायत कॉलनी या भागांत शुकशुकाट होता.

 ‘ज्यांना हिजाबच्या संदर्भातील निकाल आपल्याला अनुकूल असा हवा होता, अशा लोकांच्या कुठल्याही धमक्यांना सरकार बळी पडणार नाही’ , असे कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी म्हटले आहे. ‘आम्ही आधी भारतीय व कन्नडिग आहोत. निकाल आमच्या बाजूनेच हवा होता हा मुलींचा पवित्रा बरोबर नाही. आमचे सरकार अशा कुठल्याही धमक्यांना बळी पडणार नाही’, असे त्यांनी रामनगर जिल्ह्यातील मागडी येथे पत्रकारांना सांगितले.

आज राज्यव्यापी बंद पाळण्याचे प्रमुख मौलानांचे आवाहन

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या संदर्भात दिलेल्या निकालाबाबत ‘दु:ख’ व्यक्त करण्यासाठी गुरुवारी राज्यव्यापी बंद पाळण्याचे आवाहन कर्नाटकचे अमीर-ए-शरियत मौलाना सागीर अहमद खान यांनी केले आहे. ‘येथे वाचण्यात आलेला आदेश लक्ष देऊन ऐकावा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मी सर्व मुस्लिमांना करतो. हिजाबबाबतच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल आपला संताप व्यक्त करण्यासाठी १७ मार्च रोजी संपूर्ण कर्नाटक राज्यात दिवसभर पूर्णपणे बंद पाळला जाईल,’ असे त्यांनी एका व्हिडीओ संदेशात सांगितले. मुस्लीम समाजातील प्रत्येक घटकाला या बंदमध्ये सहभागी व्हावे लागेल असे ते म्हणाले.‘हा बंद यशस्वी करा आणि धार्मिक आचरण कायम ठेवून शिक्षण घेणे शक्य आहे हा संदेश राज्यकर्त्यांना द्या,’ असे सांगताना मौलानांनी युवकांना बंददरम्यान शांतता पाळण्याचे आवाहन केले.