काश्मीरमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीदरम्यान छऱ्याच्या गोळ्यांमुळे गंभीर दुखापत झालेल्या स्थानिकांना उपचारासाठी दिल्लीत आणण्यात येणार आहे. काल संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रूग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. काश्मीरमध्ये उसळलेल्या दंगलीदरम्यान जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून छऱ्यांच्या बंदुकांचा वापर करण्यात आला होता. यामागे आंदोलकांना कमीत कमी इजा पोहचवून नियंत्रणात आणता यावे, असा उद्देश असला तरी अनेकांच्या डोळ्यांना छऱ्यांच्या गोळ्यांमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ‘एम्स’मधून पाठविण्यात आलेल्या डॉक्टरांच्या पथकात बहुतांश डोळ्यांच्या डॉक्टरांचा समावेश होता. या जखमींची तपासणी करून ज्यांना विशेष उपचारांची गरज आहे त्यांना दिल्लीला आणण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. दिल्लीत या जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. डोळ्यांच्या गंभीर दुखापतींवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची गरज आहे. एम्स रुग्णालयात या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती श्रीनगरमध्ये असलेल्या डॉक्टरांनी दिली.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणात जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरू झाली होती. यावेळी स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक आणि हल्ले करण्यात येत होते. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून छऱ्याच्या बंदुकांचा मोठ्याप्रमाणावर वापर करण्यात आला होता. यामध्ये अनेकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे स्थानिक रूग्णालयांमध्ये मोठ्याप्रमाणावर डोळ्यांच्या दुखापतीचे रूग्ण दाखल झाले होते. मात्र, पुरेशा वैदयकीय सुविधांअभावी गंभीर दुखापत झालेल्यांवर उपचार करण्यात स्थानिक डॉक्टरांना अडचणी येत होत्या. त्यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्रीनगरमध्ये एम्सच्या डॉक्टरांचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला होता.