पीटीआय, नवी दिल्ली

थिरुअनंतपुरम-दिल्ली विमान चेन्नईला वळवून विशेषाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे के सी वेणुगोपाल यांच्यासह पाच खासदारांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ‘एअर इंडिया’वर कारवाईची मागणी केली आहे. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे के. सुरेश, अदूर प्रकाश आणि रॉबर्ट ब्रूस, तसेच ‘सीपीआय’चे (एम) के. राधाकृष्णन यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांना पत्र लिहून घटनेची तत्काळ चौकशीची मागणी केली.

बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात खासदारांनी म्हटले आहे की, १० ऑगस्ट रोजी विमान ‘एआय २४५५’मधून (थिरुअनंतपुरम-दिल्ली) येत असताना, ‘एअर इंडिया’ने विशेषाधिकाराचे उल्लंघन केले. ‘त्या तारखेला, आम्ही इतर शेकडो प्रवाशांसह प्रवास करत होतो. सायंकाळी ७:१५ वाजता नियोजित असलेले हे विमान रात्री ८:३० च्या सुमारास निघाले. सुरुवातीपासूनच प्रवासात बराच गोंधळ उडाला. प्रवाशांना थांबून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि खानपान सेवाही थांबवण्यात आली,’ असे खासदारांनी सांगितले.

उड्डाण झाल्यानंतर वैमानिकाने एक गंभीर तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगत विमान चेन्नईला वळवण्यात येईल असे जाहीर केले. चेन्नईच्या हवाई क्षेत्रात पोहोचल्यानंतर, विमान उतरले नाही परंतु एका तासापेक्षा जास्त काळ ते फिरत राहिले. दरम्यान, यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, असे खासदारांनी पत्रात नमूद केले आहे.