पीटीआय, गजवाल
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कोणतेही पद हे आपले ध्येय नसून राज्याचा विकास हेच ध्येय असल्याचा दावा केला. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये आपण ७० वर्षांचे होऊ असे सांगून त्यांनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.स्वत:चा मतदारसंघ असलेल्या गजवाल येथे अखेरची प्रचारसभा घेताना केसीआर यांनी तेलंगणात ‘इंदिरा राज्य’ परत आणण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावर टीका केली. इंदिरा गांधी यांची राजवट चकमकी, गोळीबार आणि हत्या यांनी भरलेली होती असा आरोप त्यांनी केला.
यावेळी केसीआर यांनी आपल्याला निवडून देण्याबद्दल मतदारांचे आभार मानले. तसेच पुन्हा संधी मिळाली तर राज्याचा अधिक विकास करू असे आश्वासनही दिले. ते म्हणाले, की तेलंगणा राज्याची निर्मिती हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. मी मुख्यमंत्रीपदाची १० वर्षे पूर्ण केली आहेत. तेलंगणा भविष्यात महान राज्य व्हावे ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. राज्य १०० टक्के साक्षर होईल आणि गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी अनेक आश्वासनेही दिली.