भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर त्याची जगभरात चर्चा सुरु आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफझाई हीने देखील या प्रकरणी भाष्य केले आहे. भारताच्या या निर्णयानंतर काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदयाने प्रयत्न करावेत असे आवाहन तिने केले आहे. आपल्याला काश्मीरमधील महिला आणि लहान मुलांची चिंता वाटत असल्याचे तिने ट्विटद्वारे म्हटले आहे.

मलालाने म्हटले की, माझे आजोबा तरुण असल्यापासून अर्थात ७० वर्षांच्या काळापासून काश्मीरी जनता संघर्ष करत जगत आहे. इथली मुलं हिंसाचार पाहतच मोठी झाली आहेत. त्यामुळे मला सध्या विशेषतः काश्मिरी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचीच जास्त काळजी वाटते आहे. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय समुदयाला आवाहन करु इच्छिते की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. सर्व दक्षिण आशियाई देश, आंतरराष्ट्रीय समुदाय आमचे दुःख दूर करण्यासाठी मदत करेल, अशी मला अपेक्षा आहे.

कोणत्याही मुद्द्यांवरुन कितीही विरोध असता तरी आपल्याला मानव हक्कांचे संरक्षण करावे लागेल, मुलांच्या आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल तसेच काश्मीरमधील ७० वर्षांचा वाद हा शांततेच्या मार्गाने सोडवण्यावर भर द्यायला हवा, असेही मलालाने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर राज्याला स्वायत्त दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम ३७० दोन दिवसांपूर्वी हटवण्यात आले. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात अद्याप मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात असून अद्यापही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अद्याप येथे कोणत्याही पद्धतीच्या अप्रिय घटना घडलेल्या नाहीत. मात्र, त्या घडूही नयेत यासाठी सरकारकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मलाला युसुफझाई हीने देखील काश्मीरात शांतता प्रस्थापित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.