केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये नागरिकांचे मोठे हाल झाले. पूरात अडकून पडलेल्या नागरिकांची या स्थितीतून सुटका करण्यासाठी विविध संस्था संघटनांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये लष्कराचे हवाई दल, नौदल, एनडीआरअफ, सीआरपीएफ आणि स्थानिकांचाही समावेश होता. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात काही अडचणी येत आहेत. या परिस्थितीत अनेक जण देवदूताप्रमाणे धावून आल्याने नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. जैसल यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना अनेक ठिकाणहून रोख पारितोषिक देण्यात येत आहे. त्याबरोबरच त्यांना आता एक घरही मिळणार आहे.
यामध्ये एका व्यक्तीने कोणताही विचार न करता पाण्यात बसून पायरी बनण्याचे काम केले आहे. त्याचे व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले आहेत. आपल्या जीवाची पव्रा न करता या पूरात अडकलेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे जैसल कैपी. महिलांना बोटीत चढता यावे यासाठी ते अक्षरश: गुडघे आणि हात यांच्यावर पाण्यात बसले. नाकातोंडात पाणी जाऊ नये म्हणून त्यांनी आपली मान कितीतरी वेळ एकाच अवस्थेत ठेवल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यामुळे एकप्रकारे स्वत:ची पायरी करुन त्यांनी या लोकांना मदत केली. जैसल यांचा मासेमारीचा व्यवसाय असून आपल्या कुटुंबासोबत ते मलप्पुरम येथे राहतात.
A man lending his back as a stair to help women get into a boat! #KeralaFlood
Angels come in all shapes and sizes!pic.twitter.com/2fuuKCgvYW— Harsh Goenka (@hvgoenka) August 19, 2018
जैसल हे मलप्पुरमच्या ट्रॉमा केयर युनिटमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतात. जैसल यांनी क्षणाचाही विलंब न करता लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. मदतीसाठी अशाप्रकारे धावून जाणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण नक्कीच कौतुकास्पद आहे. जैसल हे त्यांच्या बायको आणि तीन मुलांसह एका खोलीत राहतात. केरळमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ते कायम आघाडीवर असतात. त्यामुळे त्यांना मिळालेले घर हे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने बक्षिसाप्रमाणेच आहे.