तिरुवनंतपुरम : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांना त्यांच्या विद्यापीठात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची सूचना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना केली.केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना पत्र लिहिले आहे. अर्थमंत्री के.एन. बालगोपाल यांना त्यांनी विद्यापीठात नुकत्याच केलेल्या वक्तव्याबद्दल बडतर्फ करण्यात यावे, असे सांगितले. केरळ सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात विद्यापीठाबाबत आधीच वाद सुरू असताना नवीन वक्तव्य समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनीही उघडपणे राज्यपालांना लक्ष्य केले आहे.
हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी आरोप केला आहे की, अर्थमंत्री बालगोपाल यांनी १९ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ परिसरामध्ये भाषण केले होते. त्यामध्ये त्यांनी धार्मिकता आणि प्रांतवादाचा मुद्दा उपस्थित करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे ते विधान भारताच्या अखंडतेला ठेच पोहोचवणारे होते, अशाप्रकारे अर्थमंत्र्यांनी पदाच्या शपथेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले. राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंना राजीनामा देण्याची सूचना राज्यपालांनी दिली होता. त्यावरून राज्यपाल आणि केरळ सरकार यांच्या वाद निर्माण झाले होते. त्या प्रकरणाची शाई वाळत नाही, तोच राज्यपालांच्या या पत्राने पुन्हा राज्यपाल आणि पिनाराई विजयन सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.