भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारने बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला. के.एम.बशीर (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते एका मल्याळम वर्तमानपत्रात ब्युरो चीफ पदावर कार्यरत होते. तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. २०१२ बॅचचे आयएएस अधिकारी असणारे श्रीराम वेंकटरामन ही कार चालवत होते. अपघाताच्यावेळी ते दारुच्या नशेत होते. एक महिला प्रवासी त्यांच्या शेजारी बसली होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्यरात्री दीडच्या सुमारास कारने बाईकला धडक दिल्यानंतर कार जवळच्या भिंतीवर जाऊन आपटली. बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या श्रीराम यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयएएस अधिकारी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराल प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करत होता असे या अपघाताचा साक्षीदार असलेला रिक्षाचालक मनीकुत्तन यांनी सांगितले.

अमेरिकेत हार्वडमध्ये एक वर्ष शिकून मागच्याच आठवडयात श्रीराम भारतात परतले होते. एक ऑगस्टपासूनच सर्वे आणि लँड रेकॉर्ड विभागात संचालक म्हणून रुजू झाले होते. २०१२ च्या बॅचमध्ये ते दुसरे टॉपर होते. इडुक्की जिल्ह्यात देवीकुलममध्ये कार्यरत असताना त्यांनी भू माफियांविरोधात कारवाई केली होती तसेच अतिक्रमण करणाऱ्या स्थानिक सीपीआय़(एम)च्या आमदाराविरोधात कारवाई केल्यानंतर वाद निर्माण झाले होते. देवीकुलममध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच श्रीराम यांची बदली करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala ias officer sriram venkatraman driving kills journalist at midnight km basheer dmp
First published on: 03-08-2019 at 14:04 IST