केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिक लोक याचा विरोध करीत आहेत. बुधवारी मंदिराचे दरवाजे खोलल्यानंतर महिलांना येथे प्रवेशापासून रोखण्यात आले. दरम्यान, पंबा येथील डोंगर चढून वार्तांकनासाठी मंदिरात प्रवेश करु पाहणाऱ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांच्या पुरुष सहकाऱ्याला आंदोलकांनी अडवले, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक करीत परत पाठवून दिले.
#Visuals from #Kerala: Journalist Suhasini Raj reportedly working with New York Times, on her way to #SabarimalaTemple, returned midway after being stopped by protesters today. pic.twitter.com/D5bh5a1kNv
— ANI (@ANI) October 18, 2018
शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला होत असलेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर येथे दर्शनासाठी गर्दी केलेल्या महिलांना मोठ्या विरोधाचा समाना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींवरच हल्ले करीत त्यांना मंदिराच्या जवळ जाण्यापासून रोखले.
न्यूयॉर्क टाइम्ससोबत काम करणारी महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांचे सहकारी पत्रकार पंबा येथील डोंगरावर ट्रेकिंग करुन शबरीमाला मंदिरापर्यंत पोहोचले होते. गुरुवारी ज्यावेळी ते मंदिराच्या जवळ पोहोचले तर तेथील आंदोलकांच्या मोठ्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. या दोघांनाही आंदोलकांनी रोखले. त्यांनी आंदोलकांना सांगितले की आम्ही मंदिरप्रवेशासाठी नव्हे तर आपले काम करण्यासाठी आलो आहोत. मात्र, तरीही त्यांना आंदोलकांनी पुढे जाऊ दिले नाही, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली त्यामुळे इतक्या मेहनीतनंतरही नाइलाजाने त्यांना पुन्हा मागे परत फिरावे लागले.
बुधवारी शबरीमाला मंदिराचे दरवाजे खोलल्यानंतर महिलांना येथे प्रवेशाला मोठा विरोध होत आहे. सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यांत सुनावलेल्या निर्णयात मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशासाठी परवानगी दिली होती. मात्र, तरीही अनेक संघटना आणि स्थानिक लोकांनी याला विरोध केला. दरम्यान, एकाही महिलेला बुधवारी मंदिरात प्रवेश करु दिला नाही. दरम्यान, शबरीमाला प्रोटेक्शन कमिटीने केरळमध्ये १२ तास बंदची घोषणा केली होती.