थिरुवनंतपूरम : करोना निर्बंधांमुळे ठप्प झालेल्या केरळमधील पर्यटन क्षेत्राला नव्याने उभारी देण्यासाठी केरळ सरकारने प्रयत्नपूर्वक ‘बायो-बबल’ यंत्रणा उभारली आहे. करोना विषाणूपासून पर्यटक जास्तीत जास्त सुरक्षित राहावेत, हा या उपोययोजनांचा उद्देश आहे.
बायो बबल हे निर्जंतुकीकरण केलेले सुरक्षित वातावरण असलेले भाग आहेत. त्या भागांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पर्यटकांस विषाणूसंसर्गाचा धोका राहणार नाही. केरळ पर्यटन विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिलीोहे.
बायो बबल योजनेनुसार, केरळच्या कोणत्याही विमानतळावर उतरलेल्या पर्यटकाचा संपर्क हा केवळ लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांशीच येईल. तेथून पर्यटक टॅक्सीद्वारे इच्छित स्थळी पोहोचतील. या टॅक्सी केवळ खास परवाना दिलेल्या असतील आणि त्यांच्या चालकांचे पूर्ण लसीकरण झालेले असेल. याचप्रमाणे पुढे हॉटेल, रिसॉर्ट किंवा पर्यटकांना कोणाच्या घरी मुक्काम करायचा असल्यास तेथील सर्व संबंधित व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल याची खात्री केली जाईल. केरळमधील सर्व पर्यटन स्थळे सोमवारपासून पुन्हा खुली करण्यात आली. करोना प्रतिबंधक लशीची किमान पहिली मात्रा घेतलेल्या किंवा ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी नकारार्थी आल्याचा अहवाल असलेल्या पर्यटकांना तेथे प्रवेश दिला जाईल, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.