Kerala Mass Murder Update : केरळमधील एका २३ वर्षीय तरूणाने पाच जणांची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आली होती. दरम्यान या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने १४ जणांकडून ६५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते तसेच त्यांने सुरुवातीला त्याची आई आणि भावाबरोबर एकत्र आत्महत्या करण्याचा विचार केला होता. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, अफानने या हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा विचार केला होता तसेच त्याने त्याच्या प्रेयसीची हत्या केली कारण त्याला वाटलं की ती त्याच्याशिवाय जगू शकणार नाही.

नेमकं काय घडलं?

सोमवारी तिरुअनंतपुरमच्या उपनगर भागातील वेंजारामूडू आणि जवळपासच्या परिसरातील तीन घरांमध्ये अफानने त्याची आजी, काका-काकू यांच्यासह त्याचा १३ वर्षांचा भाऊ आणि प्रेयसीची हत्या केली. त्याने त्याच्या आईचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती थोडक्यात वाचली. खून केल्यानंतर २३ वर्षीय अफान याने वेंजारामूडू पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

अफानचे वडील सौदी अरेबियात राहत होते आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की कर्जाची परतफेड न केल्याने त्याच्या कुटुंबाला कर्ज देणाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. पोलिसांनी सांगितले की अफान त्याची आजी, काका आणि काकू हे कुटुंबाला आर्थिक मदत करत नसल्याच्या कारणाने त्यांच्यावर रागावलेला. जेव्हा त्याला लक्षात आले की आपण कर्ज फेडू शकणार नाहीत, तेव्हा त्याने त्याच्या आईला आणि १३ वर्षांच्या भावाला त्याच्याबरोबर आत्महत्या करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला.

पण त्याच्या आईने असं काही करण्यास नकार दिला त्यानंतर अफानने तिची आणि भावाची हत्या करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आईवर हल्ला केल्यानंतर तीचा मृत्यू झाला आहे असे वाटल्याने तो त्याच्या आजीच्या घरी गेला आणि त्याने तिची हत्या करून तिची सोन्याची साखळी चोरली.

म्हणून गर्लफेंडची हत्या

अफान त्यानंतर त्याच्या काका काकूंच्या घरी गेला आणि त्याने त्यांचीही हत्या केली. त्यानंतर तो घरी आला जेथे त्याचा भाऊ आणि गर्लफ्रेंड फरसाना होती. पोलिस अधीक्षक केएस सुदर्शन यांनी सांगितलं की त्याने त्याच्या भावाची आणि नंतर फरसानाची हत्या केली कारण त्याला वाटले की “ती त्याच्याशिवाय एकटी पडेल”.

सुदर्शन हे पुढे बोलताना म्हणाले की, कर्ज सोडून हत्येमागे इतर काही कारणे होती का याचीही चौकशी केली जाईल, तसेच अफानने आत्मसमर्पण केल्यानंतरही त्याचे वर्तन असाधरण असे होते, असेही ते म्हणाले. मानसिक आरोग्य तज्ञांच्या उपस्थितीत अफानची चौकशी केली जाईल आणि त्याची मानसिक स्थिती देखील तपासली जाईल. त्याला फरसानाबद्दल कोणताही द्वेष होता असे वाटत नाही. त्याने तिला त्याच्या एकत्र आत्महत्या करण्याच्या विचाराबद्दलही सांगितले नव्हते, असे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.