खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटका झाल्यानंतर पसार झालेला कैदी तब्बल २५ वर्षांनी स्वतःहून तुरुंगात परतला आहे. फरार झालेला कैदी अचानक तुरुंगात परतल्यानं तुरुंग अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नझर असं या कैद्याचं नाव आहे. कोचीमधील मतानचैरी येथील रहिवासी असून १९९१ मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याच्यासह इतर चौघांनाही शिक्षा सुनावण्यात आली होती. पूजापुरा येथील मध्यवर्ती तुरुंगात तो शिक्षा भोगत होता. १९९२ मध्ये न्यायालयाने त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो परतलाच नाही. २५ वर्षांनी तो स्वतःहून तुरुंगात परतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नझर (वय ५५) कॅन्सरग्रस्त आहे. बुधवारी रात्री तो पूजापुरा येथील तुरुंगात परतला. अविवाहित असलेला नझर पॅरोलवर सुटका झाल्यानंतर आखाती देशांत गेला होता. तिथे लहान-मोठी कामे करून तो उदरनिर्वाह करत होता. पाच वर्षांपूर्वीच तो परतला. येथे आल्यानंतर कॅन्सर झाल्याचं निदान झालं. या आजारावर त्यानं उपचार करून घेतले. पण खर्चाचा बोजा कुटुंबियांवर पडू नये म्हणून त्याने तुरुंगात परतण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातील नोंदी तपासल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहितीही तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.