भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारताला जगभरात बदनाम केलं जातं आहे. देशात सध्या दोन विचारधारांचा संघर्ष सुरु आहे. आमची विचारधारा गांधीवादी आहे तर मोदी, भाजपा आणि संघाची विचारधारा ही नथुराम गोडसेची आहे अशी टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली आहे. राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

अनिवासी भारतीयांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या NRI नेत्यांनी जगभरात उदारमतवादी विचार ठेवलले. आधुनिक भारताच्या निर्मितीत महात्मा गांधींसह अनेक अनिवासी भारतीयांचा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळची मुहूर्तमेढ महात्मा गांधी यांनी दक्षिण अफ्रिकेत रोवली होती. मात्र भाजपा आपल्या देशाला जगभरात बदनाम करते आहे.सध्या भारतात दोन विचारधारांचा संघर्ष सुरु आहे. पहिली विचारधारा काँग्रेस समर्पित आहे तर दुसरी विचारधारा भाजपा आणि संघ समर्पित आहे. आमची विचारधारा ही महात्मा गांधींची विचारधारा आहे. त्यांनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला. भाजपा आणि संघाची विचारधारा ही नथुराम गोडसेची विचारधारा आहे. जो हिंसक आणि भडकू व्यक्ती होता. त्याने आयुष्यातल्या वास्तवाचा कधीही सामना केला नाही.” असं राहुल गांधीनी म्हटलं आहे.

भाजपा मोदी कायम भूतकाळाच्या काय गोष्टी करतात

भारतातली सध्याची राजकीय स्थिती कशी आहे? यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की कार चालवत असताना तुम्ही मागे पाहू शकत नाही. कारण मागे पाहिलं तर तुमचा अपघात होणार हे निश्चित असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मुख्य समस्या नेमकी हीच आहे ते कायम भूतकाळाच्या गोष्टी करत राहतात. तसंच दुसऱ्याला दोष देण्यात धन्यता मानतात. दुसऱ्याला जास्तीत जास्त दोष कसा देता येईल याचा विचार करतात. भाजपा असो किंवा संघ त्यांच्याकडे भविष्याच्या दृष्टीने कुठलाही दृष्टीकोन नाही. ओडिशा अपघाताविषयी तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते सांगतील की ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने असं काम केलं होतं त्यामुळे अपघात झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी मन की बात करणार नाही

मी आज तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे. माझा संवादावर विश्वास आहे मी मन की बात करणार नाही. आम्ही मोहब्बत की दुकान चालवणारे लोक आहोत. मला जास्त रुची या गोष्टीत आहे की तुमच्या मनात काय चाललं आहे? आम्ही प्रेम आणि आपुलकी वाटणार लोक आहोत. तिरस्कार आणि द्वेष भावना वाटणारे नाही असं म्हणत राहुल गांधींनी भाजपाला टोला लगावला आहे.