scorecardresearch

Premium

कॅनडा सदैवच खलिस्तानवाद्यांचे आश्रयस्थान!

गेल्या शतकातील सत्तरच्या दशकापासून कॅनडात मोठय़ा प्रमाणात भारतीय लोकसंख्या होती. त्यात लक्षणीय संख्येने शीख समाज होता.

khalistan movement still active in canada khalistan movement connection with canada
खलिस्तान चळवळ (Darryl Dyck/The Canadian Press via AP)

नवी दिल्ली : शीख फुटीरतावाद आणि खलिस्तान चळवळीमुळे भारत आणि कॅनडाचे संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये सुरू झालेली ही खलिस्तान चळवळ कॅनडात अजूनही सक्रिय आहे. गेल्या शतकातील सत्तरच्या दशकापासून कॅनडात मोठय़ा प्रमाणात भारतीय लोकसंख्या होती. त्यात लक्षणीय संख्येने शीख समाज होता.

राजस्थानातील पोखरण येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या अणुचाचणीवरून कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टिन टड्रो यांचे पिता आणि तत्कालीन पंतप्रधान पियरे टड्रो नाराज होते. याच काळात खलिस्तान समर्थकांना कॅनडात राजकीय आश्रय मिळायला लागला. ही कॅनडातील खलिस्तान चळवळीची सुरुवात मानली जाते.

beggars in saudi arabia
पाकिस्तान भिकाऱ्यांची निर्यात करणारा देश कसा बनला? परदेशात ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे
number of children wearing glasses in India is less
चीन, सिंगापूरसह इतर देशांच्या तुलनेत भारतात मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण कमी, पण…
High Blood Pressure Hypertension
बहुतांश भारतीय हायपरटेन्शनचे बळी; ‘या’ मोठ्या समस्येमुळे येतोय उपचारांमध्ये अडथळा; WHO चा धक्कादायक अहवाल
traffic police facing problems in malegaon due to shortage manpower
पुरेशा मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांपुढे समस्या; आम्ही मालेगावकर समितीचे अधीक्षकांना साकडे

हेही वाचा >>> राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कॅनडाशी संबंधित ४३ गँगस्टर्स आणि दहशतवाद्यांचा तपशील जारी

मात्र, खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत दोन्ही देश आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही कॅनडाने अनेकदा खलिस्तानवाद्यांचा बचाव केला असून, खलिस्तान समर्थक-दहशतवाद्यांचे आश्रयस्थान ही कॅनडाची ओळख आहे. जस्टिन टड्रो  यांनी पुन्हा एकदा आपले पिता आणि तत्कालीन पंतप्रधान पियरे टड्रो  यांची आठवण करून दिली. १९६८ ते १९७९ आणि १९८० ते १९८४ या काळात पियरे टड्रो दोनदा कॅनडाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधींच्या सरकारच्या काळात १९८२ मध्ये भारताला हवा असलेल्या कुख्यात खलिस्तानी दहशतवादी तलिवदर सिंग परमार याच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती पियरे टड्रो सरकारने फेटाळली होती. राष्ट्रकुल सदस्य देशांत प्रत्यार्पण संकेत लागू होत नसल्याची सबब त्यावेळी कॅनडाने दिली होती.

शीख समाजाचे कॅनडात स्थलांतर

विसाव्या शतकात शीख समाज मोठय़ा प्रमाणात कॅनडाकडे वळला. हळूहळू तेथे स्थलांतरित होऊ लागला. ब्रिटिश कोलंबियातून जात असताना भारतीय सैनिक कॅनडाच्या सुपीक भूमीकडे आकर्षित झाले. १९७० पर्यंत शिखांची मोठी लोकसंख्या कॅनडात स्थायिक झाली. जसजशी शिखांची संख्या वाढू लागली, तसतशी खलिस्तान चळवळीची बीजेही येथे रुजू लागली.

पोखरण अणुचाचणीशी संबंध

भारताने १९७४ मध्ये राजस्थानातील पोखरण येथे अणुचाचणी केली. त्यामुळे कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रुडो अतिशय नाराज झाले. कारण कॅनडाने भारताला शांततापूर्ण कारणासाठी म्हणजे अणुउर्जा निर्मितीसाठी दिलेले ‘रिअ‍ॅक्टर’चा वापर भारताने अणुचाचणीसारख्या लष्करी कारणासाठी केला. कॅनडाच्या या नाराजीमुळे भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले. त्याच काळात भारतात खलिस्तान समर्थक चळवळ जोर धरत होती. खलिस्तान समर्थकांनी कॅनडात आश्रय घेण्यास सुरुवात केली. तसेच कॅनडा सरकारकडे राजकीय निर्वासितांचा दर्जा मागितला. अशा तऱ्हेने त्यांचा कॅनडात प्रवेश झाला. भारताशी बिघडलेल्या संबंधांमुळे कॅनडाने खलिस्तान फुटीरतावादाला प्रतिबंध घालण्यासाठी काहीही केले नाही.

कनिष्क विमानातील स्फोट

गेल्या ४० वर्षांत खलिस्तानवाद्यांना प्रोत्साहनाच्या बाबतीच कॅनडाची तुलना पाकिस्तानशी करता येणार नाही. मात्र, कॅनडात त्यांना आश्रय मिळाला. कायदेशीर आणि राजकीय अनुकूलताही मिळाली. खलिस्तानवाद्यांच्या बाबतीत कॅनडाचा सौम्य धोरणामुळे भारतीय नेते कायमच नाराज असतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९८२ मध्ये ही नाराजी व्यक्त करत कॅनडा सरकारकडे याबाबत तक्रार केली होती. कॅनडाने ज्या दहशतवादी तलिवदर सिंगचे प्रत्यार्पण नाकारले त्याने एअर इंडियाच्या कनिष्क विमानात बाँबस्फोट घडवून आणला. या दुर्घटनेत विमानातील सर्व ३२९ प्रवासी ठार झाले. त्यात सर्वाधिक २६८ कॅनडाचे नागरिक होते. मृतांत ८२ मुलांचाही समावेश होता. कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात भीषण-वेदनादायी हल्ला आहे.

टड्रो सरकारच्या काळात चालना १९९० च्या अखेरीस भारतातील खलिस्तान चळवळीला घरघर लागलेली असताना कॅनडात मात्र ती वेगाने वाढत होती. २०१५ मध्ये जस्टिन टड्रो सत्तेवर आल्यानंतर खलिस्तानची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून, खलिस्तान समर्थक सातत्याने या मागणीसाठी उघड आंदोलन करत आहेत. अनेक खलिस्तान समर्थक गट टड्रो यांच्या लिबरल पक्षाला पाठिंबा देतात. भारताने कॅनडावर खलिस्तान समर्थकांविरुद्ध कोणतीही कारवाई करत नसल्याचा वारंवार आरोप केला आहे. कॅनडावासीय शीख समाजाच्या कॅनडा सरकार लांगूलचालन करत असल्याचे त्यातून दिसते. २०१५ मध्ये जस्टिन टड्रो पंतप्रधान झाल्यानंतर त्यात आणखी वाढ झाली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khalistan movement still active in canada khalistan movement connection with canada zws

First published on: 21-09-2023 at 02:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×