केंद्रात घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुरफटलेल्या काँग्रेसने बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून दिल्लीत उद्भवलेल्या नकारात्मकतेला रोखण्याचा प्रयत्न केला. एकेकाळच्या आपल्या बालेकिल्ल्यात सात वर्षांनंतर पुनरागमन करताना काँग्रेसने सत्ताधारी भाजपची धूळधाण उडविली. येडियुरप्पा यांची बंडखोरी आणि सततची भ्रष्टाचाराची प्रकरणे यांचा जबरदस्त फटका बसून भाजपला दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता गमवावी लागली. आता, मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय कामगारमंत्री मल्लिकार्जुन खर्गे, पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते के. सिद्दरामय्या यांच्यात रस्सीखेच आहे.
भाजप आणि जनता दल धर्मनिरपेक्षला समान जागा मिळाल्याने आता मुख्य विरोधी पक्ष कोण ठरणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.   भ्रष्टाचाराच्या सततच्या आरोपांमुळे बचावाच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसमध्ये कर्नाटकातील विजयाने उत्साहही निर्माण झाला आहे.
सोनिया गांधी यांनी नेतानिवड आमदारच करतील, असे सूचित केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे, वीरप्पा मोईली आणि सीद्दरामय्या यांच्यात तिहेरी चुरस आहे. पण, खर्गे आणि मोईली यांच्यातच रस्सीखेच असल्याचे मानले जात आहे. जनता दल  मधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले सिद्दरामैया विधानसभेत विरोधी पक्षनेते असले तरी मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता कमीच आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांच्या पराभवाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे.
४५ वर्षांपासून राजकारणात असलेले आणि नऊ वेळा विधानसभेवर निवडून गेल्यानंतर गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून निवडून येत केंद्रात असणारे  दलित नेते मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत सोनिया गांधी यांचे  विश्वासातील बुजूर्ग नेते ऑस्कर फर्नाडिस यांचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

* आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू
आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असा जनमताचा कौल असेल तर तो मान्य करून आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करण्यास तयार आहोत. विरोधक या नात्याने आम्ही जनहिताचे रक्षण करू. आम्ही आमचा पराभव मान्य करीत आहोत. आम्ही निवडणुकीत भाजपला कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. याबाबत आरोप करणाऱ्यांनी आम्ही कोठे अशा प्रकारची मदत केली ते दाखवून द्यावे, असे आवाहन मी करतो. काँग्रेस राज्यात विजयी होईल, असे चित्र माध्यमांनी लोकांमध्ये निर्माण केले होते.
– एच. डी. कुमारस्वामी,
प्रदेशाध्यक्ष, जेडी (एस)