Kerala High Court Justice VG Arun: केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हीजी अरूण यांनी नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, धर्म व जातीच्या जोखडातून मुक्त वाढवलेली मुले भविष्याचं आशास्थान आहेत. केरळ युक्तिवादी संगम या संघटनेने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत असताना न्यायाधीश अरुण यांनी हे विधान केले, अशी बातमी बार अँड बेंचने दिली आहे.
न्यायाधीश अरुण म्हणाले, “मी त्या सर्व पालकांचे कौतुक करतो. जे आपल्या मुलांना शाळेत पाठवताना त्यांना धर्म आणि जातीशी न जोडता शिक्षण देतात. धर्माचा रकाना रिकामी ठेवणारे पालक खरंच कौतुकास्पद आहेत. ही मुले उद्याच्या भविष्याची आशा आहेत. ही मुले भविष्यात समाजाचा विरोध असला तरीही निर्भयपणे प्रश्न विचारू शकतील.”
केरळचे तर्कवादी लेखक पावनन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक वैशाखन यांच्याही स्मृतींना उजाळा देण्यात आला. न्यायाधीश अरुण यांनी दोन्ही लेखकांना श्रद्धांजली व्यक्त केली. दोघांनीही तर्कावर आधारित विचार केला आणि धर्मनिरपेक्षतेचे मूल जपण्यासाठी जात आणि धर्माची ओळख पुसून फक्त पहिल्या नावाचाच उल्लेख केल्याचे, त्यांनी म्हटले.
यावेळी न्यायाधीश यांनी आपल्या वडिलांचीही आठवण सांगितली. माझे वडील लेखक, राजकीय भाष्यकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते. लेखक पावनन यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी अनिलन या टोपण नावाने लिखाण केल्याचे अरुण यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील भाषेबद्दल व्यक्त केली चिंता
सोशल मीडियावरील घसरलेल्या भाषेच्या स्तराबाबतही न्यायाधीश अरुण यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सोशल मीडियावरील कमेंटकर्ते त्यांच्यावर गिधाडांसारखे झडप घालतात. सोशल मीडिया पोस्टमुळे उद्भवलेल्या अनेक प्रसंगाची सुनावणी मला घ्यावी लागते. त्यामुळे या पोस्ट मला वाचाव्या लागतात. अशा पोस्टमधील मजकूर मल्याळम भाषेला प्रदूषित करत आहे. मी अनेकदा विचार करतो की, लोक मल्याळम भाषेचा स्तर इतक्या खाली का नेत असतील. याचे कारण हेच आहे की, आपल्यामध्ये आता पवनन आणि वैशाखन सारखे तर्कवादी लेखक नाहीत.”