गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सोमवारी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याचं नाव परशुराम वाघमारे असं आहे व त्याला कर्नाटकातील सिंदगी येथून अटक करण्यात आलं आहे. मात्र त्यांनी सविस्तर माहिती सांगण्यास नकार दिला आहे. ‘आम्हाला कोणतीही माहिती जाहीर करण्याआधी त्याची चौकशी करणं गरजेचं आहे’, असं विशेष तपास पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याच्याबद्दल विशेष तपास पथकाच्या सुत्रांकडून काही माहिती मिळाली आहे. ‘आमच्या एका टीमने मराठी भाषिक व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. परशुराम असं त्याच नाव असून तो 26 वर्षांचा आहे. त्याची उंची ५ फूट १ इंच आहे. वजन जवळपास ७५ ते ८० किलो आहे. त्याच्याजवळ कोणतंही शस्त्र किंवा हत्यार सापडलेलं नाही’, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

फॉरेन्सिकने सीसीटीव्हीचा अभ्यास केला असून गौरी लंकेश यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या झाली तेव्हा दुचाकीवर असलेल्या व्यक्तीची उंची ५ फूट १ किंवा २ इंच आणि वजन ७० ते ८० किलो असल्याचा निष्कर्ष काढला होता. वाघमारे या वर्णनात बसत असून त्यानेच गोळी झाडली असावी असा संशय आहे. त्याची चौकशी केल्यावर सत्य समोर येईल असा विश्वास पोलिसांना आहे. त्याला न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले असून 14 दिवसांची कोठडी पोलिसांना मिळाली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘हिंदू युवा सेने’चा कार्यकर्ता नवीन कुमार याचा मित्र अनिल कुमार याच्या मदतीने काही स्केचेस तयार करण्यात आले आहेत. नवीन कुमार याला गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी मदत पुरवल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकाने अनिल कुमार याला न्यायालयात हजर करत त्याचा जबाब नोंदवला होता. याचा अर्थ त्याचा जबाब पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. विशेष तपास पथकाने चार्जशीटमध्ये नवीन याने गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी प्रवीण उर्फ सुजित कुमारसोबत मिळून कट रचल्याचं मान्य केल्याचं म्हटलं आहे. या अटकेमुळे गौरी लंकेश हत्या प्रकरणावर पडदा पडू शकतो आणि खरे गुन्हेगार तुरूंगात रवाना होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान हिंदू जनजागृती समितीने पत्रकार परिषद घेतली असून सुनील असगर व परशुराम वाघमारे हे दोघेही निर्दोष असल्याचा दावा केला आहे. पोलिस हिंदू संघटनांची बदनामी करत असून हे दोघेही निर्दोष असल्याचा दावा समितीनं केला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Killer of gauri lankesh taken in custody in karnataka
First published on: 12-06-2018 at 09:38 IST