scorecardresearch

किम जोंग-उनचा नवा कारनामा; ६५३ गोळ्यांसाठी अख्खं शहरच बंद केलं! दारोदार हिंडतायत कोरियन सैनिक!

गोळ्या हरवल्यानंतर लगेच त्याची तक्रार करण्याऐवजी आधी स्वत:च त्या शोधण्यासाठी निघाले होते सैनिक!

kim jong un missing bullet north korea
किम जोंग उनचा नवा फतवा, आख्खं शहरच केलं बंद! (फोटो – संग्रहित छायाचित्र)

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी तो त्याच्या लुकमुळे चर्चेत असतो, तर कधी त्याच्या गायब होण्यामुळे. कधी त्याच्या कथित वारसामुळे चर्चेत असतो तर कधी त्याच्या लहरी स्वभावामुळे. त्यामुळे किम जोंग-उन म्हटलं की काहीतरी अजब असणार, अशीच सर्वसाधारण धारणा असताना आता किमनं एक नवा कारनामा केला आहे. अवघ्या ६५३ गोळ्यांसाठी किमनं एक आख्खं शहरच बंद करून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत गोळ्या सापडणार नाहीत, तोपर्यंत शहर बंदच राहील, असा फतवाच किम जोंग-उननं काढला आहे.

काय घडलं नेमकं?

त्याचं झालं असं, की उत्तर कोरियाचं मोठं सैन्य रियांगगँग शहरात २०२०पासून तळ ठोकून होतं. करोनाचा उद्रेक झाल्यापासून सीमाभागात निगराणी आणि बाहेरील लोकांना देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी किम जोंग-उननं हे सैनिय या शहरात ठेवलं होतं. या भागात सैन्यानं गेल्या दोन वर्षांपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आता करोनाचा जोर ओसरल्यानंतर हे सैन्य माघारी घेण्याचा निर्णय किम जोंग-उननं घेतला.

रेडिओ फ्री एशियाच्या हवाल्याने फर्स्टपोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, २५ फेब्रुवारीपासून हे सैन्य माघारी घेण्यास सुरुवात झाली. ७ मार्चपर्यंत चीनचं सगळं सैन्य या शहरातून माघारीही फिरलं होतं. पण माघारीनंतर असं लक्षात आलं की सैन्याच्या दारुगोळ्यातून ६५३ गोळ्या गायब आहेत! खरंतर सुरुवातीला जेव्हा गोळ्या गायब झाल्याचं सैनिकांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी तक्रार न करता स्वत:च त्यांचा शोध सुरू केला. पण गोळ्या सापडल्याच नाहीत. शेवटी सैनिकांनी वरिष्ठांना सूचित केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

प्रत्येक घरात शोधमोहीम!

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर त्या गोळ्या शोधून काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. एकीकडे किम जोंग-उनचे सैनिक गोळ्या शोधण्याचा आटापिटा करत असताना दुसरीकडे किमनं ते आख्खं शहरच लॉकडाऊन करून टाकलं. “जोपर्यंत त्या गोळ्या सापडत नाहीत, तोपर्यंत ते शहर पूर्णपणे बंद राहील”, असा फतवाच किम जोंगनं काढला आहे. त्यानुसार किम जोंग-उनचे सैनिक दारोदार हिंडून हरवलेल्या गोळ्यांचा शोध घेत आहेत.

कुणाजवळ गोळ्या सापडल्या तर…

ज्याला कुणाला या गोळ्यांबाबत माहिती मिळेल, त्यानं लागलीच सरकारला कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कुणाकडे गोळ्या सापडल्या, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असंही बजावण्यात आलं आहे. ही शोध मोहीम सुरू होऊन आता १० दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही त्या गोळ्यांचा शोध लागलेला नाही!

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:57 IST

संबंधित बातम्या