दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालवर केलेल्या टीकेमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. सिद्धार्थने सायना नेहवालवर आक्षेपार्ह टीका केली आहे. दरम्यान यावरुन कायदा आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. किरेन रिजिजू यांनी सिद्धार्थचं वक्तव्य म्हणजे अज्ञानी मानसिकता असल्याचा उल्लेख केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे –

बॉलिवूड आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थने स्टार सायना नेहवालवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने हा वाद सुरु झाला आहे. हे प्रकरण इतके टोकाला गेले आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाने सिद्धार्थविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

“तुझे मत व्यक्त करणे आमच्यासाठी…”; अभिनेता सिद्धार्थने केलेल्या टिकेवर सायनाच्या पतीची प्रतिक्रिया

झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींसंबंधी ट्वीट करताना सायना नेहवालने “कोणतेही राष्ट्र स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करत असेल तर ते सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मी अराजकवाद्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते,” असं म्हटलं होतं. सायना नेहवाल भाजपाची सदस्यदेखील आहे.

सायना नेहवालच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने दुहेरी अर्थाचा शब्द वापरला आहे. “S**e ck जागतिक विजेती नशिब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.” असे अभिनेता सिद्धार्थने म्हटलं.

किरेन रिजिजू यांची टीका –

किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत सिद्दार्थच्या टीकेवरुन सुनावलं आहे. “भारताला स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्यात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारताला सायनाचा अभिमान आहे. ऑलिम्पिक पदक विजेतीसोबतच ती एक देशभक्त आहे,” असं माजी क्रीडा राज्यमंत्री म्हणाले आहेत. अशा आदर्श व्यक्तिमत्वावर अशी घाणेरडी टिप्पणी करणे ही व्यक्तीची दुर्लक्षित मानसिकता दर्शवते असंही ते म्हणाले आहेत.

प्रियांका चतुर्वेदी यांचीही नाराजी

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही सिद्धार्थच्या या ट्विटचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी, “कोणीही असे शब्द वापरणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि असभ्य भाषा आहे. काहीही झाले तरी भाषेत सभ्यता असली पाहिजे, असे म्हटले आहे.

अभिनेता सिद्धार्थचे स्पष्टीकरण

वाद वाढल्यानंतर सिद्धार्थनेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा म्हणणे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे, कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाली सायना?

याप्रकरणी सायनानेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “त्याला (सिद्धार्थ) काय म्हणायचे होते ते मला माहित नाही. एक अभिनेता म्हणून मी त्याच्यावर प्रेम केले पण हे (ट्विट) चांगले नव्हते. तो स्वत:ला चांगल्या शब्दात व्यक्त करू शकतो पण पण मला वाटते की हे ट्विटर आहे आणि अशा शब्दांनी आणि टिप्पण्यांद्वारे तुमची दखल घेतली जाईल.”