भ्रष्टाचाराचे आरोप जेटली यांनी फेटाळले; चौकशीवर आझाद ठाम
बहुचर्चित दिल्ली क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित गैरव्यवहारप्रकरणी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादाचे पडसाद थेट संसदेत उमटले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘डीडीसीए’तील कथित गैरव्यवहाराचे खापर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर फोडल्याने संसदेची दोन्ही सभागृहांत विरोधकांनी जेटलींना लक्ष्य केले. जेटली यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना स्वत:वरील आरोपांचे खंडन केले. ‘डीडीसीए’चा मुद्दा उपस्थित करणाऱ्या के.सी. वेणुगोपाल यांनी भाजप खासदार कीर्ती आझाद यांचाही संदर्भ दिला होता. त्यावर आझाद यांनी केंद्र सरकार भ्रष्टाचाराविरोधात लढण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही देत ‘डीडीसीए’तील कथित गैरव्यवहारप्रकरणी विशेष तपास पथक स्थापण्याची मागणी करून सरकारलाच अडचणीत आणले. सभागृहात अरुण जेटली यांचे नाव न घेण्याची काळजी आझाद यांनी घेतली.
लोकसभेत या मुद्दय़ावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. जेटली या वेळी उपस्थित होते. आरोपांचे खंडन करताना जेटली म्हणाले, काँग्रेसच्या काळात जवाहरलाल नेहरू स्टेडिअमच्या दुरुस्तीवर नऊशे कोटी रुपये खर्च झाले होते, तर अवघ्या ११४ कोटी रुपयांमध्ये ४२ हजार आसनक्षमतेचे नवे स्टेडिअम बांधण्यात आले.
डीडीसीएच्या नव्या मैदानावर झालेल्या खर्चाची चौकशी होऊन त्यात आर्थिक अनियमितता झाली नसल्याचा अहवाल होता; परंतु विरोधक आकांडतांडव करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नेहरू स्टेडिअमवर झालेल्या नऊशे कोटी रुपयांची माहिती दिली तर तुम्ही (काँग्रेस) अडचणीत याल, अशा शब्दांत जेटली यांनी विरोधकांना सुनावले.

‘दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा’
आझाद म्हणाले की, २००८ ते २०१३ दरम्यान डीडीसीएने घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कालावधी निश्चित व्हावा. त्यासाठी सीबीआयच्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे. आझाद यांच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांचा सूर मवाळ झाला. याच वेळी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू लोकसभेत आले. त्यांनी जेटलींची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जेटलींच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. डीडीसीएचे अध्यक्ष असताना जेटली यांनी १४ बोगस कंपन्यांना कंत्राटे देऊन कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.