दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेमधील (डीडीसीए) कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून स्वपक्षीय नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर दोषारोप करणारे भाजप खासदार कीर्ती आझाद यांच्यावर पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी शिस्तभंग केल्याप्रकरणी आझाद यांना पक्षातून निलंबित केले. आज संसदेचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. पक्षाची शिस्त मोडून अरूण जेटली यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी आझाद यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारने डीडीसीए प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची घोषणा केल्यानंतर जेटली यांनी लगेचच सोमवारी ‘केजरीवाल टीम’ला कोर्टात खेचले होते. त्यानंतर कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन जेटलींना घरचा आहेर दिला होता. बदनामीचा खटला दाखल करताना जेटली यांनी माझे नाव का टाळले? त्यांनी माझ्याविरोधातही खटला दाखल करावा, असे ट्विटदेखील किर्ती आझाद यांनी केले होते. आझाद यांनी हे ट्विट जेटली यांच्या ट्विटर हॅण्डला मेन्शन केले होते.