भारतात एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियातर्फे आयोजित केलेल्या ‘मलिका-ए-किचन’ २०१३ या खाद्यपदार्थ बनविण्याच्या स्पध्रेत ‘मलिका-ए-किचन’ हा किताब कोइम्बतूरच्या के. एन. नित्या यांनी पटकावला. या स्पध्रेच्या अंतिम फेरीत ११ जणींमध्ये  बटर-मिल्क चिकन, चिकन ग्रेव्ही, चिकन आइसस्टिक, खीर हे पदार्थ बनवून नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ बनविण्यात आपणच सरस असल्याचे त्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेत पुण्याच्या अनामिका सिंग यांनी दुसरे, तर कोलकात्याच्या सोनिया भट्टाचार्य यांनी तिसरे स्थान पटकावले. नवी दिल्ली येथे ‘ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पध्रेत नामांकित शेफ नीता मेहता, शेफ दिनेश भाटिया, टीव्हीवरील सूत्रसंचालक सौम्या टंडन हे परीक्षक होते. या स्पध्रेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या के. एन. नित्या यांना दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन येथे होणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘ग्रॅण्ड मास्टर होम शेफ’ या स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
१८ सप्टेंबरला ११ विभागांमध्ये सुरू झालेल्या या स्पध्रेत तीन हजार स्पर्धकांमधून अंतिम फेरीत के. एन. नित्या, आर. पद्मश्री, जानकी रमाणी, कविता नंदवना, पुजा गुप्ता, इंदू गुप्ता, मालविका निरजेश, सोनिया भट्टाचार्य, अनामिका सिंग, तृप्ती शेळके, डॉली राठोड या अकरा महिलांची  निवड करण्यात आली. यंदा ही स्पर्धा एलजी मायक्रोवेव्ह विकत घेतलेल्या ग्राहकांपुरतीच मर्यादित करण्यात आली होती, हे विशेष.
या स्पध्रेच्या विजेत्या के. एन. नित्या यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वयंपाक करणं मला मनापासून आवडतं. विजयी होण्याच्या हेतूनेच मी या स्पध्रेत सहभागी झाले होते. या स्पध्रेत नावीन्यपूर्ण तसेच पदार्थामध्ये नवनवीन बदल करून आरोग्यदायी पदार्थ बनविण्याकडे माझा कल होता आणि मी त्यात यशस्वी झाले. या स्पध्रेमुळे मला खूपच आत्मविश्वास मिळाला. या स्पध्रेत विजयी झाल्याने मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचे मी सोने करेन.
होम अप्लायन्सेस एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे विक्री प्रमुख राजीव जैन म्हणाले की, ‘एलजी’ने २००९ मध्ये एलजी मायक्रोवेव्हचे मार्केटिंग करण्याच्या हेतूने ‘मलिका-ए-किचन’ ही स्पर्धा सुरू केली. गृहिणींना स्वयंपाकातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर एलजी मायक्रोवेव्हच्या मार्केटिंगमध्येही यश मिळेल, या हेतूनेच ही स्पर्धा सुरू करण्यात आली. देशभरात या स्पध्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा ही स्पर्धा फक्त एलजी मायक्रोवेव्ह विकत घेणाऱ्या ग्राहकांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. या स्पध्रेचा एलजी मायक्रोवेव्हच्या विक्रीत खूप मोठा सहभाग असल्याचे सांगताना या स्पध्रेने आम्ही ग्राहकांशी जोडले गेलो, हेही नमूदक केले.
शेफ नीता मेहता म्हणाल्या की, अशा प्रकारच्या स्पर्धामुळे गृहिणींमधील स्वयंपाकातील कौशल्याला वाव मिळेल आणि प्रतिष्ठाही मिळेल. आजच्या स्पध्रेतील विजेत्यांचा विशेष म्हणजे त्यांनी नावीन्यपूर्ण पदार्थ बनवून त्यात स्वत:च्या कौशल्याची भर घातली, हे विशेष.
एलजीने ही स्पर्धा सुरू करून भारतीय गृहिणींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिले आहे, अशी भावना सहभागी स्पर्धकांनी व्यक्त केली.