लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे जागावाटप कोल्हापूरच्या जागेसाठी अडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६:२२ फॉम्र्युल्याऐवजी २७:२१ चा आग्रह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस हायकमांडकडे धरला आहे. राष्ट्रवादीच्या वाटय़ाचा हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. पक्षाच्या समन्वय समितीचे प्रमुख व केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅण्टोनी यांचीदेखील चव्हाण यांनी भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक विधाने करीत आहेत. त्यावर चव्हाण यांनी अ‍ॅण्टोनी यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीचा कितीही आग्रह असला तरी २६:२२ चा फॉम्र्युला मुख्यमंत्री चव्हाण यांना अमान्य आहे.  
मुख्यमंत्री चव्हाण ‘दै. लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, जागावाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू आहे. येत्या दोनेक दिवसांत त्यासंबंधी अंतिम निर्णय होईल. केवळ जागावाटप नव्हे तर इतरही राजकीय विषयांवर राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय घ्यावा, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला अल्टीमेटम दिला होता. काँग्रेस मात्र सावधपणे चर्चा करीत आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, वसईची जागा बहुजन विकास आघाडी तर अकोला भारिप बहुजन महासंघाला सोडण्यास आम्ही अनुकूल आहोत. कोल्हापूरबाबत लवकरच निर्णय होईल. केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खडगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेल्या ४८ मतदारसंघांच्या अहवालावरदेखील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस उमेदवारांची घोषणा येत्या आठ ते दहा दिवसांत होण्याची शक्यता आहे.