* उत्तर कोरिया अण्वस्त्र चाचणीसाठी सज्ज
* दक्षिण कोरियाचा धोक्याचा इशारा
* अमेरिकेची टीका
उत्तर कोरियाने अमेरिकेसह दक्षिण आशियातील इतर राष्ट्रांविरोधात गेल्या काही दिवसांपासून आपल्या युद्धखोर स्वभावाचे दाखविलेले दर्शन आणखी गडद होऊ लागले आहे. नव्या अण्वस्त्र चाचण्यांसाठी उत्तर कोरिया सज्ज झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी दक्षिण कोरियाने आपल्या लष्करी यंत्रणांना धोक्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान-की-मून यांनी कोरिया द्वीपकल्प खवळला असून, नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर अमेरिकेने उत्तर कोरियाच्या भूमिकेवर कडवी टीका केली आहे. दरम्यान, उत्तर कोरिया कुठल्याही प्रकारच्या अणुयुद्धास सक्षम असल्याबाबत शंका असल्याचे पाकिस्तानचे अण्वस्त्र निर्माते ए.क्यू. खान यांनी स्पष्ट केले.
होते आहे काय?
सध्या कोरिया द्वीपकल्पावर पसरलेला युद्धज्वर पाहता मित्रराष्ट्र चीनने दिलेल्या सल्ल्याला धुडकावूून उत्तर कोरिया अणुचाचण्या घेण्यास सज्ज झाल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संघटनेने म्हटले आहे. मध्य पल्ल्याच्या क्षमतेची क्षेपणास्त्र चाचणी उत्तर कोरिया करणार असल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे. गेल्या आठवडय़ामध्ये राजधानी नोन्याँगमधील परदेशी दूतांना १० एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश उत्तर कोरियाने दिला होता. उत्तर कोरियाचे संस्थापक दिवंगत किम संग यांच्या जयंतीनिमित्ताने १५ एप्रिल रोजी उत्तर कोरिया अण्वस्त्र चाचण्या करणार असल्याची चर्चा त्यानंतर होऊ लागली. मंगळवारी आपल्या धमकीमध्ये वाढ करत द्वीपकल्प भू आण्विक युद्धाकडे सरकत असून, दक्षिण कोरियामधील परदेशी नागरिकांनीही आपल्या देशांत परतण्याचा सल्ला उत्तर कोरियाने दिला. उत्तर कोरिया आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या सीमाही बुधवारी बंद करण्यात आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर दक्षिण कोरिया- अमेरिका यांच्या संयुक्त फौजांनीही आपल्या युद्धसतर्कतेमध्ये वाढ केली आहे. अण्वस्त्रांच्या अनेक चाचण्या येत्या काळामध्ये घेण्यास उत्तर कोरिया सरसावली असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी चीनच्या नेत्यांना हा तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याचे सांगितले. गुरुवारी बान की मून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहेत. कोरिया द्वीपकल्पावरील सध्याची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. छोटीशी घटनाही धोकादायक परिस्थिती तयार करू शकते. लहान चूकही परिस्थितीवरील नियंत्रण हरवून बसू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी उत्तर कोरियामुळे परिस्थिती आणखी चिघळत असल्याचे म्हटले आहे.
नवे काय? बुधवारी उत्तर कोरिया आणि चीन यांमध्ये असलेला सर्वात मोठा सीमाभाग अणुतणावाच्या पाश्र्वभूमीवर बंद करण्यात आला. मात्र दोन्ही देशांमधील व्यावसायिक आदान-प्रदान सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर कोरियामध्ये जाणाऱ्या सर्व पर्यटन संस्थांना चीनच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात आले. मात्र व्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या प्रवासाला उत्तर कोरियाने बंदी घातली नाही.
उत्तर कोरिया सुशेगात !
जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये युद्धाची भीतीवादळे तयार करून सर्वच जगाचे लक्ष आपल्याकडे वळविणारे उत्तर कोरियामधील समाजजीवन सुशेगात चालले असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. जपानला सहज लक्ष्य करू शकणाऱ्या अण्वस्त्रांची चाचणी करण्याची उत्तर कोरियाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र उत्तर कोरियामधील समाजजीवनावर युद्धखोरपणाचा कसलाच मागमूस नसल्याचे दक्षिण कोरियाने केलेल्या गुप्त पाहणीत दिसून आले. उत्तर कोरियामधील नागरिक युद्धाची तयारी नाही, तर शहर सजविण्यासाठी एकत्र आलेले दिसत आहेत. सैनिक बांधकाम भागांवर, तर रस्ते फुला- झाडांच्या सजावटीसाठी माळ्यांनी कंबर कसली असल्याचे पाहणीमध्ये दिसून आले.
जपानची ‘ट्विट’ चूक?
उत्तर कोरियाने बुधवारी अण्वस्त्रचाचणी केल्याचे चुकीचे ट्विट योकोहोमा शहरामधील अधिकाऱ्याने केल्यामुळे काही काळ तणावपूर्ण गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बुधवारी दुपारी या अधिकाऱ्याने ट्विटरवरून उत्तर कोरियाने चाचणी केल्याचे जाहीर केले. उत्तर कोरियाच्या चाचण्यांमुळे जपान अतिदक्षता बाळगून आहे. त्यात या ट्विट गोंधळाने काही काळ जपानी नेटविश्वात भीती पसरली. २० मिनिटांनी हे चूक असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र वापराबाबत पाक अणुशास्त्रज्ञाची साशंकता
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अणुप्रकल्प कार्यक्रमाचे पितामह म्हणून ओळखले जाणारे वादग्रस्त ए. क्यू. खान यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र वापराबाबत साशंकता व्यक्त केली. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेविरोधात अण्वस्त्रांचा वापर करू शकेल, इतकी सक्षमता अद्याप उत्तर कोरियामध्ये नाही. तसेच असा वापर करण्याइतके उत्तर कोरियाई नेता किम जोंग मूर्ख नाहीत, असे खान यांनी स्पष्ट केले. फॉक्स न्यूजशी दूरध्वनीवरून बोलताना ते म्हणाले की, उत्तर कोरिया हे अत्यंत लहान राष्ट्र आहे. एखादा लहानसा बॉम्बही या राष्ट्राला पूर्णपणे संपविण्यासाठी पुरेसा आहे. अमेरिकेसोबत उत्तर कोरियालाही या वास्तवाची जाण आहे, मात्र चुकीच्या प्रचारामुळे उत्तर कोरियाच्या क्षमतेबाबत गैरसमज निर्माण केला जात आहे. उत्तर कोरियाने यापूर्वीची चाचणी ११ फेब्रुवारी रोजी घेतली होती. ती अत्यंत कमी पल्ल्याची क्षमता असलेली अस्त्रे होती. अण्वस्त्रनिर्मिती आणि विकासाबाबत पाकिस्तान आणि उत्तर कोरियाने एकत्रित काम केल्याचे खान यांनी कबूल केले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
खवळला कोरिया!
* उत्तर कोरिया अण्वस्त्र चाचणीसाठी सज्ज * दक्षिण कोरियाचा धोक्याचा इशारा * अमेरिकेची टीका उत्तर कोरियाने अमेरिकेसह दक्षिण आशियातील इतर राष्ट्रांविरोधात गेल्या काही दिवसांपासून आपल्या युद्धखोर स्वभावाचे दाखविलेले दर्शन आणखी गडद होऊ लागले आहे.

First published on: 11-04-2013 at 05:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korea agrassive