पाकिस्तानने मान्य केली भारताची मागणी, कुलभूषण जाधव यांना भेटण्याची दिली परवानगी

भेटीची वेळही ठरली…

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.

इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी चार वाजताची वेळ देण्यात आली आहे. दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी, ही मागणी सुद्धा पाकिस्तानने मान्य केली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

कुठल्याही अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.

कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटया आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. आयसीजेच्या निकालानुसार, काऊंन्सलर अ‍ॅक्सेस तसेच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे.

मागच्या आठवडयात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता.

“कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kulbhushan jadhav case india gets second consular access dmp