भारत आणि चीनमध्ये काल सातव्या फेरीची चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारताच्या हद्दीत चुशूलमध्ये काल ही बैठक पार पडली. वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

भारत आणि चीनमध्ये यापूर्वी लष्करी स्तरावर चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. पण त्यातून ठोस काहीही निष्पन्न झालेले नाही. चर्चेनंतर प्रत्येकवेळी चीनकडून विश्वासघाताचा अनुभव आला. आता चीनकडूनच चर्चा सकारात्मक झाल्याचे पहिल्यांदाच सांगण्यात आले आहे.

“दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे सविस्तर चर्चा केली. नियंत्रण रेषेवर तैनात असलेले सैन्य, तिथला तणाव कमी करण्यासंदर्भात परस्परांची मते, विचार अधिक विस्तृतपणे समजून घेतले” असे चीनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

“रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे दोन्ही बाजूंचे मत आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सामंजस्याने जे काही ठरलं आहे, त्याची लवकरच अमलबजावणी केली जाईल. मतभेद वादांमध्ये बदलू नयेत. सीमेवर शांतता आणि स्थिरता राहिली पाहिजे” असे स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरुन चर्चा सुरु ठेवायची तसेच व्यवहार्य आणि परस्परांना मान्य असलेला तोडगा लवकरात लवकर काढायचा असे दोन्ही देशांमध्ये ठरल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. पूर्व लडाखमध्ये संघर्षाची स्थिती असलेल्या सर्व भागांमधून चीनने लवकरात लवकर आणि पूर्णपणे सैन्य माघारी बोलवावे, या आपल्या मागणीवर भारत ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लेह स्थित १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी भारताच्यावतीने बैठकीचे नेतृत्व केले. लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव नवीन श्रीवास्तव सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.