उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणामध्ये लखनऊचे पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी पोलीस दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा पुत्र आशीष मागावर असल्याचं सांगितलं आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशीषविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या आशीषच्या मागावर आहेत.
आजतकला दिलेल्या माहितीनुसार आशीषला अटक करण्यासाठी पोलिसांची पथक काम करत आहेत. लखीमपूरमध्ये घडलेल्या प्रकरणामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशीषविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडिया टुडेने या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआर कॉपीच्या आधारे केलेल्या वृत्तांकनानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आशीष मिश्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला. तसेच शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाडीमध्ये आशीष होता असाही उल्लेख या एफआयआरमध्ये आहे.
“दुपारी तीनच्या सुमारास आशीष मिश्री १५-२० जणांसोबत तीन गाड्यांमधून अगदी वेगाने बनबीरपूरमधील आंदोलनाच्या ठिकाणी आले. मोनू मिश्रा हा या महेंद्रा थार गाडीच्या पुढील भागी डाव्या बाजूस बसला होता. त्याने गोळीबार केला. गाडी वेगाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमधून गेली,” असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. “सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले व्हिडीओ आणि माहितीचाही तपासासाठी वापर केला जात आहे,” असं सिंह यांनी सांगितलं.
लखीमपूर खेरी हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. सुर्यकांत आणि न्या. हिमा कोहली त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी आज सकाळी सुरु झाली. या प्रकरणात आशीष याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी त्याला अद्याप अटक झालेली नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच सुनावणीदरम्यान न्यायालयाने योगी सरकारकडून या प्रकरणामध्ये काय कारवाई करण्यात आलीय यासंदर्भातील माहिती मागवलीय. आरोपी कोण आहेत? ज्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे त्यांना तुम्ही अटक केली आहे की नाही हे आम्हाला माहित असणे आवश्यक आहे, असं म्हणत न्यायालयाने राज्य सरकारकडून माहिती मागवलीय.