प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलन शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला होता. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण साहिब धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता दीप सिद्धू याचं नाव समोर आलं होतं. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला होता. त्याचबरोबर दीप सिद्धूला अटक करण्याची मागणीही सातत्यानं केली जात होती.

आणखी वाचा- शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप होत असलेला दीप सिद्धू कोण?

लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धूने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. “दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” असं शेतकरी नेते गुरनाम सिंह चाडूनी यांनी घटनेनंतर म्हटलं होतं. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं होतं.

राजकीय पक्षांकडूनही दीप सिद्धूला अटक करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती. दीप सिद्धूचं नाव भाजपासोबतही जोडण्यात आलं होतं. त्याचबरोबर या हिंसाचारामागे भाजपा असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनी केला होता. वारंवार सिद्धूच्या अटकेची मागणी केली जात असताना अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं याबद्दलची माहिती दिली आहे.