गेल्या तीन दशकांपासून मिझोरमच्या राजकारणात सक्रिय असणारे आणि चार वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणारे लाल थानवाला यांनी शेरछिप आणि हरांगतुरजो या मतदारसंघातून विजय मिळवत राज्यात आपण काँग्रेसचा चेहरा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ७१ वर्षीय लाल थानवाला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा आपल्याच हातात सत्ता राहणार हे दाखवून दिले आहे आणि लाल थानवाला हे पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याची तयारी करीत आहेत. १९८४ मध्ये लाल थानवाला यांच्या गळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. १९ मे १९४२ रोजी जन्मलेल्या लाल थानवाला यांनी १९६३-६४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते काही काळ पत्रकारितेतही सक्रिय राहिले. मात्र त्यानंतर स्वतंत्र राज्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाकडे ते आकर्षिले गेले आणि लालडेंगा यांच्या नेतृत्वाखाली मिझो राष्ट्रीय आघाडीशी (एमएनएफ) जोडले गेले. येथूनच राजकीय प्रवास सुरू झालेल्या लाल थानवाला यांना आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर १९६७ मध्ये सरकारने त्यांना विद्रोह केल्याच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात धाडले होते. १९७३ साली मिझोरम प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि तेव्हापासून ते राज्यात काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. १९७८ मध्ये मिझोरम-म्यानमार सीमेवरील चांफाई मतदारसंघातून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर चढउताराच्या  राजकीय प्रवासात त्यांना हारही पत्करावी लागली होती. १९९८ मध्ये शेरछिप मतदारसंघात एमएनएफचे उमेदवार के. थांगझुआला यांच्याकडून पराभूत झाले होते. मात्र त्यानंतरही २००३ मध्ये एमएनएफ सत्तेत असताना याच मतदारसंघातून विजय मिळवत विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली होती.