चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लालूप्रसाद यांना आता तुरूंगवासादरम्यान माळीकाम करावे लागणार आहे. रांचीतील बिरसा मुंडा तुरूंगात लालूप्रसाद यादव एक कैदी म्हणून काम करतील आणि त्याचे त्यांना पैसेही मिळतील. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार या कामापोटी लालूप्रसाद यांना दररोज ९३ रूपये मिळतील.

लालूप्रसाद यांना हजारीबाग खुल्या तुरूंगात पाठवण्यात येईल. लालूप्रसाद यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर त्यांना विशेष न्यायालयातूनच जामीन मिळाला असता. तीन वर्षांहून अधिक वर्षांची शिक्षा असल्यामुळे जामिनासाठी लालूप्रसाद यांना आता उच्च न्यायालयाशिवाय पर्यायच नाही.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लालूंनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले. हुकूमशाही सरकारला साथ न दिल्यामुळे मला आज शिक्षा भोगावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

९५० कोटींच्या चारा घोटाळ्यात दुसऱ्यांदा अपराधिक षडयंत्र आणि भ्रष्टाचाराच्या कलमातंर्गत शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी चारा घोटाळ्यातच चाईबासा कोषागारशी निगडीत एका प्रकरणात त्यांना तीन ऑक्टोबर २०१३ मध्ये पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.