बिहारच्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून शपथ घेताना लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी चुकीचा शब्द उच्चारल्याने राज्यपालांनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितली. पुन्हा शपथ घेतानाही त्यांच्याकडून एका शब्दाचा उच्चार चुकला. त्यावेळी राज्यपालांनी पुन्हा त्यांना तो शब्द बरोबर उच्चारण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांची शपथ पूर्ण झाली.
मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आवश्यक असलेला मजकूर कागदावर लिहिलेला असतानाही तेज प्रताप यादव यांच्याकडून अपेक्षित शब्दाऐवजी उपेक्षित असा शब्द उच्चारला गेला. त्यामुळे शपथ पूर्ण झाल्यावर राज्यपाल रामनाथ गोविंद यांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. यानंतर पुन्हा शपथ घेण्याला सुरुवात झाल्यावरही त्यांच्याकडून दुसऱ्या एका शब्दाचा उच्चार चुकला. त्यावेळी राज्यपालांनी लगेचच त्यांना थांबवत शब्दाचा योग्य उच्चार काय असल्याचे सांगितले. यानंतर तेज प्रताप यादव यांनी त्या शब्दाचा बरोबर उच्चार करून उर्वरित शपथ पूर्ण केली.