श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत बोटी जप्त करून ३४ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. काल रात्री त्यांना तलाईमन्नार व कांगेसनथुराई दरम्यान श्रीलंकेच्या दक्षिण किनारी भागात अटक करण्यात आल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने म्हटले आहे. त्यांना जाफना व मन्नार येथे मच्छीमारी निरीक्षण संस्थांच्या ताब्यात देण्यात आले आहे. श्रीलंका सरकारने असा दावा केला की, भारतीय मच्छीमार श्रीलंकेतील सागरात येऊन मासेमारी करतात, त्यामुळे त्यांची यंत्रसामुग्री जप्त करणारा नवा कायदा करण्याचा विचार आहे. मच्छीमार विभागाच्या तामिळनाडूतील प्रवक्तयांनी सांगितले की, श्रीलंकेच्या नौदलात पाल्कच्या सामुद्रधुनीत कच्छिथीवू नजीक ३४ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे.
विभागाच्या सहसंचालकांनी सांगितले की,पुडुकोट्टाई जिल्ह्य़ातील कोटाईपट्टिनमच्या २३ मच्छीमारांना श्रीलंका किनाऱ्यावर नेदूथीवू येथे अटक करण्यात आली, तर इतरांना कच्छिथीवू येथे मासेमारी करताना पकडण्यात आले.
श्रीलंकेच्या नौदलाने दोन बोटी एकमेकांवर आदळवून त्यांचे नुकसान केले असून सात बोटी जप्त केल्या, तसेच ४० मासेमारी जाळी नष्ट केली.