लष्कर ए तोयबाचा दहशतवादी महंमद नावेद हा दहशतवाद्यांनी रूग्णालयावर केलेल्या हल्ल्यात पळून गेल्याच्या प्रकरणी विविध टप्प्यांवर सुरक्षेत त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या तर यात चुका झाल्याच, पण राज्याच्या गृहमंत्रालयाने दहशतवाद्यांना वेगळ्या तुरूंगात  हलवण्याचे आदेश घाईने काढल्यामुळे नावेद पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या गृह खात्याने दहशतवादी व इतर काही कैद्यांना जम्मूतील कथुआ येथून श्रीनगरच्या तुरूंगात आणण्याची घाई केली ती अंगाशी आली आहे. ६ फेब्रुवारीला एसएमएचएस रूग्णालयावरील हल्ल्यात बावीस वर्षांचा नावेद पळून गेला आहे. त्याने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठापुढे त्याला काश्मीरविभागातील तुरूंगात हलवण्यात यावे अशी याचिका १९ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल के ली होती. नंतर २७  जानेवारी २०१७ रोजी राज्याच्या गृह खात्याने उच्च न्यायालयाचे आदेश पाळण्यासाठी घाईने असा आदेश काढला की, २०१४ मध्ये दहशतवाद पसरवण्याच्या उद्देशाने काश्मीरमध्ये घुसलेल्या नावेद याला कथुआ तुरूंगातून श्रीनगरच्या तुरूंगात हलवण्यात यावे. तत्कालीन विशेष सचिव दिलशाद शाहीन यांनी हा आदेश जारी केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुप्ततेच्या अटीवर सांगितले की, नावेदला हलवण्यात निष्कारण घाई करण्यात आली.अशा दहशतवाद्यांना लोक सुरक्षा कायद्याखाली केव्हाही काश्मीर खोऱ्याबाहेरील तुरूंगात टाकता आले असते. एकसदस्यीय खंडपीठाच्या उपरोक्त आदेशाला आव्हानही देता आले असते. नावेद हा सर्वात घातक दहशतवादी असून त्यामुळे त्याला वेगळ्या तुरूंगात ठेवले आहे, असा युक्तिवाद करता आला असता.  त्याला दक्षिण काश्मीरमधील तुरूंगात किंवा दहशतवाद्यांना नेहमी ठेवले जाते त्या हुमहमा तुरूंगात ठेवता आले असते, कारण उच्च न्यायालयाने अमुक एका तुरूंगात दहशतवाद्यांना हलवा असा आदेश दिला नव्हता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lashkar e taiba terrorist mohammad naveed
First published on: 19-02-2018 at 01:18 IST