Ahmedabad plane crash अहमदाबादहून लंडन या ठिकाणी निघालेल्या विमानाचा काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. टेक ऑफ नंतर ८०० फुटांच्या वर गेलेलं विमान कोसळलं आणि यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. नेमका किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. विमानात क्रू मेंबर्ससह एकूण २४२ जण होते त्यापैकी एक प्रवासी वाचला आहे अशी माहिती मिळते आहे. दरम्यान या अपघाताच्या करुण कहाण्या आता समोर येत आहेत. एका डॉक्टरचं कुटुंबही असंच संपलं आहे. त्यांनी या विमानात कुटुंबासह काढलेला सेल्फी शेवटचा ठरला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होते आहे.

अखेरच्या सेल्फीमागे काय गोष्ट दडली आहे?

डॉ. कोमी व्यास या उदयपूर येथील रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि त्यांनी लंडन येथे त्यांच्या पतीसह प्रॅक्टिस करायचं ठरवलं. त्यांचे पती प्रतीक जोशी यांनीच पत्नी कोमी आणि तीन मुलांसह हा सेल्फी काढला. विमान प्रवास सुरु होताना काढलेला हा सेल्फी आपल्या कुटुंबाचा अखेरचा सेल्फी ठरणार हे कुठे डॉक्टर प्रतीक जोशींना माहीत होतं? पण घडलं तेच. अहमदाबादहून विमानाने उड्डाण केलं आणि त्यानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं. या सेल्फीमध्ये डॉ. प्रतीक आणि त्यांची पत्नी कोमी शेजारी बसले आहेत. तर त्यांच्या मागे जी तीन मुलं दिसत आहेत ती या डॉक्टर दाम्पत्याची मुलं आहेत. विमान अपघातात यांच्या पैकी कुणीही वाचलं नाही.

डॉ. प्रतीक आणि कोमी हे कुटुंबासह लंडनला स्थायिक होणार होते

डॉ. प्रतीक आणि कोमी व्यास हे दोघंही सुरुवातीला उदयपूर येथील रुग्णालयात कार्यरत होते. त्यानंतर प्रतीक हे लंडन येथे गेले आणि तिथे स्थायिक झाले. मागील आठवड्यात ते परतले होते. त्यानंतर कोमी यांनी इथल्या रुग्णालयातील नोकरीचा राजीनामा देऊन लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याला दोन जुळी मुलं आहेत आणि एक मुलगी आहे. या सगळ्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

प्रतीक यांच्या भावाने काय सांगितलं?

डॉ. प्रतीक जोशी यांचे वडील शहरातले प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट आहेत. तर कोमी यांचे वडील पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आहेत. प्रतीक त्याची पत्नी कोमी आणि तीन मुलांना भेटण्यासाठी आठवडाभरापूर्वीच अहमदाबादला आला होता. त्यानंतर या त्या दोघांची चर्चा झाली आणि सगळ्या कुटुंबाने लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सगळे आता आम्हाला सोडून गेले असं प्रतीकचा भाऊ नयनने सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी घटना काय?

अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारं विमान एआय-१७१ उड्डाणानंतर तीन मिनिटांनी विमानतळाच्या सीमेजवळ कोसळलं अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता उड्डाण केलेल्या बोइंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व प्रवाशांच्या नातेवाईकांना एअर इंडियाकडून सहकार्य केलं जात आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करत आहे. तसेच या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवरील प्रोफाइल फोटो हटवला आहे.