‘दी न्यूयॉर्क टाइम्स’कडून खिल्ली
कॉमेडियन तन्मय भट याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर एका चित्रफितीत विनोदी टिप्पणी केल्यानंतर आता ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तन्मय भटसारखीच अक्कल पाजळली असून, लता मंगेशकर या तथाकथित गायिकाआहेत, असे सांगून त्यांचा आणखी अपमान केला आहे. भारतात तन्मय भट याने जे केले त्याच्या बाजूने व विरोधात अशी दोन्ही प्रकारची मते उमटली असली तरी परदेशात त्यामुळे नाहक अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एनवायटीच्या लेखात तन्मय भटच्या प्रकरणात म्हटले आहे, की तो वाद झाला ते ठीक आहे, पण पोलिसांनी फेसबुक व यूटय़ूबवरून ती दृश्यफीत काढून टाकण्यास सांगितले ते आमच्या मते योग्य नाही. भट याच्या दृश्यफितीचे वर्णन करताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे, की लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्याबाबत स्ॅनपचॅटवर तयार केलेल्या या व्हिडिओ चित्रफितीत फेस स्व्ॉप फीचर वापरण्यात आले आहे. लता मंगेशकर यांची कारकीर्द १९४० पासून लोकांपुढे आहे. त्यांनी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले व त्यावर चित्रपट अभिनेते व अभिनेत्री नृत्य करीत असत. ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने यापूर्वी ‘इंडियाज बजेट मिशन टू मार्स’ या व्यंगचित्रातही भारताची खोड काढली होती. त्या व्यंगचित्रात फेटा घातलेला एक भारतीय दिसत असून, एलिट स्पेस क्लब असे लिहिलेल्या खोलीच्या दरवाजावर गाय ढुश्या मारताना दाखवले होते. त्या व्यंगचित्राबाबत ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने माफी मागितली होती. भारताचा, त्यांच्या सरकार व लोकांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू यात नव्हता असे म्हटले होते. भारताच्या कमी खर्चाच्या मंगळ मोहिमेची टिंगलटवाळी करण्याचा तो प्रकार होता. २०१५ मध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पुन्हा भारताची खोडी काढताना पॅरिस हवामान परिषदेच्या निमित्ताने एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते व त्यात कोळशाचे इंजिन असलेल्या रेल्वेपुढे हत्ती बसलेला दाखवला होता. पॅरिस हवामान परिषदेत भारताने अमेरिकेला हवी ती भूमिका घेतली नाही, त्याचा त्रागा या व्यंगचित्रातून व्यक्त झाला होता. गरीब देशच जास्त प्रदूषण करतात असा त्याचा अन्वयार्थ होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar a so called singer says new york times
First published on: 02-06-2016 at 02:09 IST