गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त आज अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे. त्याशिवाय या चौकात एक ४० फूट आणि १४ टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सकाळीच ट्वीट केलं. “लतादीदींच्या जयंतीच्या निमित्ताने अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला आठवतायत. त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी आपुलकीनं आणि प्रेमानं साधलेला संवाद मला आठवतोय. मला आनंद आहे की आज अयोध्येमधील एका चौकाला लता मंगेशकर यांचं नाव दिलं जात आहे. देशातील एका महान व्यक्तिमत्वाला ही एक सार्थ आदरांजली ठरेल”, असं मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, ४० फुटी वीणेच्या मूर्तीचं उद्घाटन करताना मोदींनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला आठवतंय की जेव्हा अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजन झालं, तेव्हा लतादीदींचा मला फोन आला होता. त्या खूप आनंदी होत्या. राम मंदिराची उभारणी केली जात आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता”, अशी आठवण मोदींनी यावेळी आपल्या भाषणात सांगितली.