गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ( २८ सप्टेंबर ) ९२ वी जयंती. त्यानिमित्त अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे. तसेच, तिथं एक ४० फूट आणि १४ टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “लतादीदींसोबत माझ्या अनेक भावनिक आठवणी आहेत. आम्ही जेव्हा बोलायचो तेव्हा त्यांचा आवाज मला मंत्रमुग्ध करून टाकायचा. मला आठवतंय की जेव्हा अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजन झालं, तेव्हा लतादीदींचा मला फोन आला होता. त्या खूप आनंदी होत्या. राम मंदिराची उभारणी केली जात आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता,” अशी आठवण नरेंद्र मोदींनी सांगितली.

दरम्यान, ४० फुटी वीणेच्या मूर्तीचं उद्घाटन करताना मोदींनी लता मंगेशकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

हेही वाचा – नवरात्रोत्सवातच एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; पाहा कोणाचे वेतन कितीने वाढले

“देशातील एका महान व्यक्तिमत्वाला…”

लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सकाळीच ट्वीट केलं. “लतादीदींच्या जयंतीच्या निमित्ताने अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला आठवतायत. त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी आपुलकीनं आणि प्रेमानं साधलेला संवाद मला आठवतोय. मला आनंद आहे की आज अयोध्येमधील एका चौकाला लता मंगेशकर यांचं नाव दिलं जात आहे. देशातील एका महान व्यक्तिमत्वाला ही एक सार्थ आदरांजली ठरेल,” असं पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.