भारताचे माजी पंतप्रधान, कवीमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्वांनीच त्यांचा आदरांजली वाहत शोक व्यक्त केला. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत असणारे आपले संबंध, आठवणींना उजाळा दिला. गानसम्राजी लता मंगेशकर यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लता मंगेशकर यांनी लिहिलं आहे की, ‘अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर माझ्यावर जणू डोंगरच कोसळला आहे. मी त्यांना वडिलांच्या जागी मानत होते, आणि त्यांनीही मला मुलीचं स्थान दिलं होतं. मला ते इतके प्रिय होते की मी त्यांना दादा म्हणायचे. आज मला तेवढंच दु:ख झालं आहे जितकं माझ्या वडिलांच्या निधनावेळी झालं होतं. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो’.

शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते १ दरम्यान पार्थिव भाजपा केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी एक ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar mourns atal bihari vajpayee death
First published on: 16-08-2018 at 19:13 IST