देशात तयार करण्यात आलेला पहिला अंतराळ अग्निबाण (स्पेस रॉकेट) दक्षिण कोरियाने गुरुवारी प्रक्षेपित केला. उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमासाठी हा देश करत असलेल्या प्रयत्नातील हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

‘नुरी’ या तीन टप्प्यांच्या अग्निबाणात स्टेनलेस स्टील व अ‍ॅल्युमिनियमच्या ब्लॉकच्या स्वरूपातील दीड टन वजनाचा भार (पेलोड) ठेवण्यात आला होता. हा पेलोड ते पृथ्वीपासून ६०० ते ८०० किलोमीटर अंतरावर कक्षेत नेऊ शकले की नाही, हे लगेच कळले नाही.

४७ मीटरचा हा अग्निबाण नारो अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आल्यानंतर तेजस्वी पिवळ्या रंगाच्या ज्वाला मागे सोडत अवकाशात झेपावत असल्याचे थेट प्रक्षेपणात दिसले. दक्षिण किनाऱ्याजवळील एका लहान बेटावर असलेले हे देशातील एकमेव अवकाश केंद्र आहे. अध्यक्ष मून जाए-इन यांनी हे प्रक्षेपण पाहिले.

अभियंत्यांना अग्निबाणाच्या व्हॉल्व्हची तपासणी करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने त्याचे प्रक्षेपण सुमारे तासाभराने लांबले. जोराने वाहणारे वारे  व इतर घटकांमुळे यशस्वी प्रक्षेपणापुढे आव्हाने उभे राहण्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. हा अग्निबाण पेलोड कक्षेत यशस्वीरीत्या नेऊ शकले की नाही हे ठरवण्यासाठी सुमारे ३० मिनिटे लागतील, असे कोरिया एअरोस्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.