करोनामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकजण घरुन काम करत आहेत. अनेकांच्या वर्क फ्रॉम होमला तर आता तीन महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे. पुढेही काही महिने अशाचप्रकारे घरुन काम करावे लागणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. अनेकदा वर्क फ्रॉम होमदरम्यान ऑफिसच्या मिटींग, चर्चा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केल्या जातात. मात्र या चर्चांमध्ये सहभागी होताना घरुन काम करतानाही नीट आवरुन बसावं लागत असल्याचा अनुभव अनेकांनी सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. मात्र अशाच प्रकारे वर्क फ्रॉम होम करताना एका वकिलाने केलेला हलगर्जीपणा त्याला चांगलाच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

करोनामुळे सर्वोच्च न्यायलयही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खटल्याची सुनावणी करत आहे. मात्र अशाच एका सुनावणीदरम्यान घरुन सहभागी होताना एक वकील चक्क टी-शर्ट घालून बेडवर लोळत सुनावणी ऐकत होता. मात्र हा वकील अशाप्रकारे लोळत सुनावणी ऐकत असल्याचे समजल्यानंतर न्यायाधिशांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. सामान्यांशी संबंधित खटल्यांची सुनावणीदरम्यान किमान शिष्टाचार पाळला पाहिजे असं मत न्यायाधिशांनी नोंदवलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला उपस्थित राहताना वकिलांनी व्यवस्थित पोषाख करावा आणि टापटीप रहावं असं सांगतानाच गरज नसणाऱ्या गोष्टी वकिलांनी व्हिडिओ कॉलमध्ये दाखवू नये असंही सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती एस. रविंद्र भट यांनी या प्रकरणामध्ये वकिलाने मागितलेली माफी स्वीकारली आहे. “बेडवर टी-शर्ट घालून झोपत सुनावणी ऐकत न्यायालयाच्या कामाकाजामध्ये सहभागी होणं चुकीचं होतं,” अशी कबुली या वकिलाने दिली आहे. “व्हिडिओच्या माध्यमातून होणाऱ्या सुनावणीदरम्यान उपस्थित राहताना सर्वांनीच एक शिष्टाचार पाळावा. तसेच घरातील खासगी गोष्टी आणि खटल्याशी संबंधित नसणाऱ्या गोष्टी (आजूबाजूची जागा, घरातील वस्तू आणि इतर गोष्टी) व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी,” असं न्यायलयाने १५ जून रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

“आपण सर्व कठीण काळातून जात आहोत आणि व्हर्चूअल सुनावणी ही वेळेची गरज आहे. असं असलं तरी किमान शिस्त पाळली गेली पाहिजे. खटला हा सार्वजनिक विषयांसदर्भातील असल्याने खटल्याला उपस्थित राहताना चांगले कपडे, बॅकग्राऊण्ड (घरात कुठे उभं राहून सहभागी व्हायचं) यासारख्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे.

हरियाणामधील रावेरीमधील एका खटल्याची सुनावणी दुसऱ्या न्यायलयामध्ये वर्ग करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करत असताना वकिलाच्या उपस्थितीवर न्यायलयाने आक्षेप नोंदवला. सध्या सर्वोच्च न्यायलयाकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जात आहे. अशाचप्रकारे एप्रिल महिन्यामध्ये राजस्थान उच्च न्यायलयामध्ये एक वकील चुकीच्या पद्धतीचे कपडे घालून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाला होता. यावेळेसही न्यायलयाने यावर आक्षेप घेतला होता.