Lay’s Potato Chips Recalled in US: बटाट्याचे चिप्स ही गोष्ट अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत बहुतेक सगळ्यांच्या आवडीची गोष्ट! मग ते घरात किंवा बाहेरचं गेट-टुगेदर असो किंवा मग कुठली ट्रिप. प्रत्येकासाठी चिप्स हा स्नॅक्समधला आवडीचा विषय! बटाट्याचे चिप्स विकणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणजे ‘Lays’. जवळपास सर्वच दुकानांमध्ये ‘लेज’चे चिप्स विक्रीसाठी ठेवलेले पाहायला मिळतात. पण दोनच दिवसांपूर्वी ‘लेज’नं त्यांच्या अनेक चिप्स प्रकारांपैकी क्लासिक पोटॅटो चिप्सची हजारो पाकिटं बाजारातून माघारी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. अमरिकेतील बाजारपेठेबाबत ‘लेज’नं हा निर्णय घेतला आहे. पण असं घडलं तरी काय?

Classic Potato Chips मध्ये काय आढळलं?

२७ जानेवारी रोजी ‘लेज’नं त्यांच्या वेगवेगळ्या श्रेणींपैकी ‘क्लासिक पोटॅटो चिप्स’ची दवळपास ६ हजार ३४४ पाकिटं बाजारातून माघारी घेतली. ही सर्व पाकिटं प्रामुख्याने अमेरिकेच्या ओरेगॉन आणि वॉशिंग्टन या शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं माघारीच्या या प्रक्रियेला घटनेच्या महत्त्वानुसार ठरवण्यात आलेल्या ‘क्लास १’ श्रेणीत समाविष्ट केलं आहे. या पाकिटातील चिप्समध्ये असणाऱ्या घटकांचा काही लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी तक्रार ‘लेज’कडे आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकी तक्रार काय होती?

‘लेज’कडे यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार अमेरिकेतील या दोन शहरांमध्ये विकल्या जाणाऱ्या ‘लेज’च्या क्लासिक पोटॅटो चिप्समध्ये दुधाचे घटक आढळून आले. दुधाची अनेकांना अॅलर्जी असते. मात्र, दुधाचे घटक चिप्समध्ये असल्याचं पाकिटावर नमूद करण्यात आलेलं नव्हतं. दुधाची अॅलर्जी असणाऱ्यांसाठी हे चिप्स खाणं जिवावर बेतण्याचीही शक्यता आहे, असं ‘लेज’कडे आलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

दरम्यान, ‘लेज’च्या पाकिटांवरील उत्पादनाची तारीख आणि कोड तपासण्याचं आवाहन कंपनीकडून वॉशिंग्टन आणि ओरेगॉन भागातील नागरिकांना करण्यात आलं आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२५ नंतरची उत्पादनाची तारीख असणारी पाकिटंच खरेदी करण्यास सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विपरीत परिणाम झाल्याची कोणतीही तक्रार नाही

दरम्यान, हे चिप्स खाल्ल्यामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याची किंवा अॅलर्जी झाल्याची कोणतीही तक्रार आत्तापर्यंत दाखल झालेली नाही. तसेच, ‘लेज’च्या इतर उत्पादनांच्या बाबतीतही असा कोणताही प्रकार आढळून आला नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.