लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक, काँग्रेस व भाकपविरोधात प्राप्तिकर विभागाची नोटीस या ताज्या राजकीय घडामोडींविरोधात ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या एकजुटीला नवे बळ मिळाल्याचे दिसू लागले आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी, ३१ मार्च रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने ‘इंडिया’च्या नेत्यांची जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित असतील.

शिवाय, काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, कल्पना सोरेन, भाकपचे महासचिव डी. राजा, सीपीआय-एलएलचे नेते दीपांकर भट्टाचार्य, द्रमुकचे तिरुचि शिवा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जी. देवराजन आदी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आपचे नेते गोपाल राय यांनी दिली. 

हेही वाचा >>>अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा सांगता समारंभ मुंबईमध्ये १७ मार्च रोजी झाला होता. शिवाजी पार्कवरील या कार्यक्रमामध्येही ‘इंडिया’तील बहुसंख्य नेत्यांचा सहभाग होता. त्यानंतर दोन आठवडय़ांच्या काळात दिल्लीत झालेल्या केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ‘इंडिया’चे नेते एकत्र येत आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांमध्ये ‘इंडिया’तील घटक स्वतंत्रपणे लढत असले तरी भाजपविरोधात त्यांची एकजूट टिकून असल्याचा मुद्दा रामलीला मैदानावरील सभेतून अधोरेखित केला जाणार आहे.