हॉटेलमधील खोलीची काच तोडून एक बिबट्या खोलीत दाखल झाल्याने मधुचंद्र साजरा करण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यावर बाका प्रसंग ओढवला. ही घटना रविवारी नैनिताल येथे घडली. रविवारी सकाळी पाचच्या सुमारास एक बिबट्या तल्लीताल बाजारातील एका हॉटेलमध्ये घुसला. या दाम्पत्याचे नशीब बलवत्तर होते, त्यांच्यावर हल्ला न करता बिबट्या बाथरूममध्ये जाऊन बसला. सकाळी जवळजवळ ४.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक खिडकीची काच तुटल्याचा आवाजाने माझी झोप उडाली. एक बिबट्या खोलीत घुसलेला पाहून मी आश्चर्यचकीत झालो. पत्नीसोबत मी पटकन चादरीत लपलो आणि पाहिलं तर बिबट्या बाथरूममध्ये जात होता. बाथरूमचा दरवाजा बंद करून मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पाचारण केले, मधुचंद्रासाठी मेरठहून येथे आलेल्या सुमितने सांगितले. हॉटेलच्या मालकाने लगेचच याची माहिती पोलीस आणि वनाधिकाऱ्यांना दिली. बिबट्याबाबतची माहिती मिळताच प्राणी संग्रहालय आणि वन विभागाचे कर्मचारी तातडीने हॉटेलमध्ये दाखल झाले. परंतु, तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता. बाधरूममध्ये कोंडून ठेवलेल्या बिबट्याने तेथील काच तोडून पलायन केले होते. मधुचंद्रासाठी आलेले हे दाम्पत्य आपल्या कुटुंबियांसमवेत या हॉटेलात वास्तवास होते. कुटुंबाचे अन्य सदस्य बाजूच्या खोलीत झोपले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांचा एक झुंड बिबट्याचा पाठलाग करत होता. त्यांच्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात बिबट्या हॉटेलमध्ये घुसला. बिबट्याला खोलीत पाहून या दाम्पत्याने प्रसंगावधान राखत चादरीत लपून स्वतःचे प्राण वाचवले. गेल्या महिन्यातदेखील एक काळे अस्वल नैनीझीलमध्ये पोहताना आढळून आले होते. जे काही वेळाने जंगलात निघून गेले होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2016 रोजी प्रकाशित
Leopard enters in nainital hotel: मधुचंद्रासाठी आलेल्या दाम्पत्याच्या खोलीत बिबट्याचे आगमन
बिबट्याच्या मागे कुत्रे लागल्याने तो हॉटेलमध्ये घुसला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-08-2016 at 13:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard enters in young couple room in nainital hotel